पोलिस अधिकार्‍यांना अधिकार प्रदान; 31 डिसेंबर, मानवंदना कार्यक्रम सोहळा | पुढारी

पोलिस अधिकार्‍यांना अधिकार प्रदान; 31 डिसेंबर, मानवंदना कार्यक्रम सोहळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नववर्षाचे स्वागत करण्याकरिता 31 डिसेंबर रोजी पर्यटकांची होणारी गर्दी व 1 जानेवारी 2023 रोजी पेरणे फाटा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 25 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 च्या अधिकारान्वये पोलिस अधिकार्‍यांना अधिकार प्रदान केले आहेत.

त्यानुसार मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने कोणत्या वेळात काढव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व वेळा निश्चित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलिस अधिकार्‍यांना असतील.

त्याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे, व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश्श वाद्ये वाजविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Back to top button