‘आरएमसी प्लांट’मुळे नागरिक त्रस्त; बावधन खुर्द परिसरातील समस्या | पुढारी

‘आरएमसी प्लांट’मुळे नागरिक त्रस्त; बावधन खुर्द परिसरातील समस्या

कोथरूड; पुढारी वृत्तसेवा : बावधन खुर्द परिसरात असलेल्या आरएमसी प्रकल्पामधून दिवसरात्र वातावरणात धूर सोडला जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत असून, वातावरणातील धूलिकणामुळे परिसरातील श्वसनासंबंधीच्या आजारांत वाढ होत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने या प्रकल्पावर कारवाई करण्याबाबत प्रशासनाकडून मडोळसफ डोळेझाक केली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केले जात आहे.

मुख्य शहरासोबत उपनगरेदेखील वेगाने विकसित होत आहे. बावधन खुर्ददेखील झपाट्याने विकसित होत असून, उंच इमारती उभ्या राहत आहेत. बावधन खुर्दमधील स. क्र. 33 मध्ये मागील वर्षभरापूर्वी प्लांट उभा करण्यात आला. या प्लांटमधून दिवस-रात्र धूर बाहेर पडत असतो. हवेत धूर विरघळत नसल्याने दिवसभर तो नजरेस दिसत असतो तसेच श्वास घेण्यास देखील त्रास होत असतो, अशी तक्रार स्थानिकांनी केली.

आर. एम. सी प्लांट असून, केमिकलयुक्त धूर बाहेर पडत असतो. तसेच सिमेंट, खडी, तयार झालेले मटेरिअल ने-आण करण्यासाठी मोठ्या आकाराच्या वाहनांची वर्दळ होत असते, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर नागरिकांनी माहिती दिली. केमिकलयुक्त धुरामुळे खिडक्या बंद करून आम्हाला घरात राहण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही, असा तक्रार महिलावर्गाने केली.

रहिवासी भाग मोठा असून, हा प्लांट मोठ्या दिमाखात उभा आहे. यासाठी बांधकाम विभाग किंवा प्रशासनाच्या अन्य विभागाकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत, नक्कीच यामागे राजकीय व्यक्ती किंवा बड्या अधिकार्‍याचा वरदहस्त असावा, अशी उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे.

कामामुळे या परिसरात वारंवार ये-जा करणे सुरू असते. परिसरात पसरत असलेल्या हवेतील धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असतो. यामुळे वाहन चालवताना लक्ष विचलित होत असते. रहिवासी भागात प्लांट उभारताना पालिका बांधकाम विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाने स्थानिकांचा विचार करणे आवश्यक आहे. प्रशासनाने यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी आमची मागणी आहे.

                                                                   – विराज डाकवे,
                                                                सामाजिक कार्यकर्ते

बावधन खुर्द परिसरातील संबधित आरएमसी प्लांट मालकांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे. या प्लांटवर लवकरच कारवाई करण्यात येईल.

                                                                – निवृत्ती उतळे,
                                               उपअभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

नागरिकांच्या तक्रारीनुसार या प्रकल्पाची लवकरच पाहणी करण्यात येईल. त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

                                                     – नितीन शिंदे , उपप्रादेशिक अधिकारी,
                                                             महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Back to top button