बालविवाह प्रकरणी अकरा जणांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल | पुढारी

बालविवाह प्रकरणी अकरा जणांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही तिचा विवाह केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोडणी कामगाराची ही मुलगी असून तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला.
याप्रकरणी संबंधित मुलीला ससून हाॅस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल असताना शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख व डाॅ. वृंदा अग्रवाल यांच्यासमोर जबाब दिला. त्यानुसार तिचा पती, सासरे, चुलत सासरे, चुलत दीर , वडील , आई, आजोबा व आजी यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित मुलीने यासंबधी फिर्याद दिली. ती सध्या १५ वर्षे ५ महिने वयाची आहे. तिचे आई-वडील ऊसतोडणीचे काम करतात. सध्या ते बारामती परिसरात वास्तव्यास आहेत. आत्याच्या मुलाशी तिचा १५ जून २०२१ रोजी विवाह लावण्यात आला. तिचा पती हा ऊसतोडणीचेच काम करतो. विवाहानंतर तिला दिवस गेले. त्या स्थितीत ती पतीसोबत अंथुर्णे (ता. इंदापूर) भागात ऊसतोडणीसाठी आली. १ डिसेंबर रोजी तिला त्रास होऊ लागल्याने बारामतीच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

तेथून तिला ससून हाॅस्पिटलला हलविण्यात आले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिला. तिचे वय कमी असल्याचे लक्षात येताच हाॅस्पिटलकडून याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार तिचा जबाब घेत फिर्याद दाखल करून घेत विवाह लावून देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button