भोर : युवराज शहाजीराजे भोसले यांची येसाजी कंक वाड्यास भेट | पुढारी

भोर : युवराज शहाजीराजे भोसले यांची येसाजी कंक वाड्यास भेट

भोर; पुढारी वृत्तसेवा : किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भाटघर धरण जलाशय भागातील भुतोंडे (ता. भोर) येथील सरसेनापती यसाजी कंक वाड्यास श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत युवराज शहाजीराजे भोसले यांनी रविवारी (दि. 4) भेट दिली.
या वेळी येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत कंक, राजेंद्र कंक, सिद्धार्थ कंक यांचेसह रणमर्द शिलेदार संस्थेतील असंख्य मावळे ऐतिहासिक पेहरावात उपस्थित होते.

रणमर्द शिलेदार संस्थेच्या किल्ले राजगड ते किल्ले तोरणा या मोहिमेचा शुभारंभ सरसेनापती येसाजीराव कंक वाडा भुतोंडे येथून श्रीमंत युवराज शहाजीराजे छत्रपती आणि कंक कुटुंबातील सर्व वंशजांच्या उपस्थितीत झाला. या वेळी शहाजीराजे छत्रपती आणि सिद्धार्थ कंक यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

कंक घराण्याच्या वतीने सिद्धार्थ कंक यांनी कंक घराण्याचा संपूर्ण इतिहास आणि छत्रपती घराणे व कंक घराणे यांचे परंपरागत ऋणानुबंध याबद्दल माहिती दिली. तर, शहाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती आणि कंक कुटुंबातील हे ऐतिहासिक नाते आणि ऋणानुबंध चिरकाल टिकून राहतील, आम्ही नेहमी हक्काने भुतोंडे येथील कंक वाड्यावर येत राहू, अशी ग्वाही देऊन मोहिमेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी कंक कुटुंबातील सर्व सदस्य, पुणे, सातारा, कोल्हापूर, चिपळूण, अहमदनगर अशा विविध भागांतील शिवभक्त उपस्थित होते.

Back to top button