…त्या गुन्हेगारांच्या चार तासांत आवळल्या मुसक्या | पुढारी

...त्या गुन्हेगारांच्या चार तासांत आवळल्या मुसक्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  रिक्षात आलेल्या तिघांनी पिंपरी परिसरात वेगवेगळ्या ठिकणी गोळीबार करून दहशत पसरवली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मंगळवारी (दि. 6) पोलिस आयुक्त अंकुश शिंदे स्वतःदेखील रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवत घटनेनंतर अवघ्या चार तासांच्या आत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. शाहरुख शाहनवाज शेख (29 रा. गुलाबनगर, दापोडी), मोहम्मद शोएब नौसार अलवी (26 रा. पवारवस्ती, दापोडी) फारुख शाहनवाज शेख (रा. गुलाबनगर, दापोडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चिंचवड येथील पत्रा शेड झोपडपट्टीमध्ये रिक्षातून आलेल्या आरोपींनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर लागोपाठ भाटनगर, बौद्धनगर भागातही आरोपींनी हवेत गोळ्या झाडल्या. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा व अतिवरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, परिसरात चौकशी केल्यानंतर आरोपी शाहरुख शेख हा मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, शाहरुखच्या शोधात पथके रवाना झाली. दरम्यान, पोलिस शिपाई गणेश सावंत, विनोद वीर व सुमीत देवकर यांना माहिती मिळाली की, शाहरुख हा दापोडीत लपून बसला आहे. त्यानुसार, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी शाहरुखकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा साथीदार शोएब अलवी, सागर मलिक ऊर्फ मायकल, फारुख शेख यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी मोहम्मद अलवी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तर, फारुख शेख याच्या गुंडाविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेचे दरोडा विरोधी पथक, युनिट एक, युनिट दोन, युनिट तीन यासह गुंडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली.

भावाचे नाव घेतल्याने फायरिंग केल्याची कबुली

आरोपी शाहरुख शेख व मोहम्मद अलवी हे दोघे दापोडी येथे एकाच परिसरात राहत असल्याने ते मित्र आहेत. शाहरुख शेख याचा भाऊ इरफान शेख याच्यावर पिंपरी येथे एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्यात नाव घेतल्याचा शाहरुखच्या मनात राग होता. याबाबत त्याने मोहम्मद अलवी याला सांगितले. त्यानुसार, मंगळवारी तिघेजण रिक्षातून पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड येथे संबंधित फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन इरफान शेख यांचे गुन्ह्यात नाव का घेतले, असे म्हणून शिवीगाळ केली. त्या वेळी मोहम्मद अलवी याने शेजारील किराणा स्टोअरमध्ये असलेल्या इसमास सीसीटीव्ही बंद कर अशी धमकी देऊन, त्यास मारहाण करून गोळीबार केला. त्यानंतर रिक्षातून लिंक रोड, भाट नगर व बौद्धनगर येथे जाऊन पुन्हा हवेत गोळीबार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

Back to top button