पिंपरी : धक्कादायक ! २ दिवसांत १० जणांचा मृत्यू , संशयित मृत्यूंचे प्रमाण वाढतंय ?

File Photo
File Photo

संतोष शिंदे : 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर परिसरात मागील दोन दिवसांत दहा जणांचा मृत्यू झाल्याची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. यातील सातजणांच्या मृत्यूचे कारण न देता डॉक्टरांनी 'व्हिसेरा' राखून ठेवला आहे. डॉक्टरांनी घेतलेल्या या सावध पवित्र्यामुळे शहरात संशयित मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मयत प्रकरणे प्रलंबित

डॉक्टरांनी स्पष्ट मत न दिल्यामुळे पोलिसांकडे तपासासाठी असलेली आकस्मित मयत प्रकरणांची निर्गती करण्यात अडचणी येतात. न्यायवैदिक प्रयोगशाळेतून व्हिसेरा तपासणीचा अहवाल येण्यासाठी तीन महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे मयत प्रकरणांची पेंडन्सी वाढत असल्याचे प्रभारी अधिकारी सांगतात..

…म्हणून पोस्टमॉर्टम महत्त्वाचे

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो मृत्यू नैसर्गिक आहे की, अनैसर्गिक हे शोधण्यासाठी मृताचे पोस्टमॉर्टम केले जाते. तसेच, नातेवाइकांकडून मिळालेली माहिती, पोलिस पंचनामा आणि डॉक्टरांचे मत यावर तपासाची दिशा ठरते. खून, बलात्कार करून हत्या, आत्महत्या किंवा विषप्रयोग यासारख्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो.

बोट दाखवायला नको जागा

मयत प्रकरणाचा तपास करणारा पोलिस अधिकारी / कमर्चारी डॉक्टराचा स्पष्ट अहवाल असल्याशिवाय निर्गती करण्याच्या फंदात पडत नाही. भविष्यात मृताचा एखादा नातेवाईक पोलिसांवर देखील आरोप करण्याची शक्यता असते. तसेच, काही प्रकरणात डॉक्टरांनादेखील संशयाच्या कटघर्‍यात उभे राहावे लागते. त्यामुळे व्हिसेरा ठेवण्याचा पर्याय अवलंबला जात आहे. यामध्ये 'दूध का दूध' आणि 'पानी का पानी' होत असल्याचे तपासी अधिकारी आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे.

प्रॉपर्टीचे वाढते वादही व्हिसेराचे कारण

पिंपरी- चिंचवडमध्ये मालमत्तेच्या वादातून एकेमकांवर दावे दाखल करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जमिनींना आलेला सोन्याचा भाव, हे एक यामागचे मुख्य कारण आहे. सधन घरातील एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाला, तरीही डॉक्टर निरीक्षण नोंदवण्याची घाई करीत नाहीत. कारण भविष्यात एखादा उठून मालमत्तेच्या वादातून घातपाताचा संशय व्यक्त करू शकतो. या कारणामुळेदेखील व्हिसेरा ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे.

…या अवयवांची होते तपासणी

एखाद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यास डॉक्टर मृताचे आतडे, यकृत, किडनी, रक्त, त्वचेचा काही भाग, मांसाचे व हाडांचे काही भाग काढून ठेवतात. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत या अवयवांची तपासणी केली जाते.

'व्हिसेरा'म्हणजे काय ?

एखाद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यास डॉक्टर पोस्टमॉर्टम दरम्यान मृतदेहाची बाह्य व अंतर्गत तपासणी करतात; मात्र तरीही काही प्रकणात मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याबाबत डॉक्टरांना नेमके कारण सांगता येत नाही. त्या वेळी शरीरातील काही अवयव आणि रक्त तपासणीसाठी काढून ठेवले जाते. यालाच 'व्हिसेरा' असे म्हणतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news