

बारामती; पुढारी वृत्तसेवा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकणार्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्याच्या खिशातील 15 हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आली होती. त्यानंतर दुचाकीवरून त्याला उसाच्या पिकात नेत नग्न फोटो काढत जबरदस्तीने एटीएम सेंटरमध्ये नेण्यात आले होते.
या वेळी तेथे रक्कम काढून घेणार्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. राहुल धोंडीबा हुगाडे (वय 23, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती), सुमीत किशोर पवार (वय 24, रा. बांदलवाडी, ता. बारामती) आणि भूषण भास्कर रणसिंग (वय 20, रा. मार्केट यार्ड रोड, बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे व सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी ही माहिती दिली.
रविवारी (दि. 4) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली होती. रविवारी हा विद्यार्थी सुभद्रा मॉलमध्ये खरेदी करीत कॉलेजकडे निघाला असताना या तिघांपैकी एकाने त्याच्या खिशातील 15 हजार रुपये काढून घेतले होते. त्याचा जाब तो विचारत असताना दुसर्या दुचाकीवरून दोघे तेथे आले. या तिघांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत ऊसपिकात नेले.
तेथे त्याला नग्न करीत त्याचे शूटिंग व फोटो घेतले. ते व्हायरल करण्याची धमकी देत एटीएम केंद्रात नेत दोन ट्रान्झेक्शनद्वारे त्याच्या खात्यातून 14 हजार 500 रुपये काढण्यात आले होते. त्याला केलेल्या मारहाणीत त्याच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले होते. या प्रकारामुळे हा विद्यार्थी कमालीचा भयभीत झाला होता. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करीत याप्रकरणी तिघांना अटक केली.