बारामती तालुक्यात गहू, हरभरा जोमदार | पुढारी

बारामती तालुक्यात गहू, हरभरा जोमदार

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभर्‍याची पेरणी लांबली होती. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी गेल्याने मोकळ्या झालेल्या शेतात गहू व हरभर्‍याची पिके शेतकर्‍यांनी घेतली आहेत. ठोस उत्पन्न देणारे उसाचे पीक म्हणून हा भाग ओळखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाची शेती असल्याने गेल्या काही वर्षात गहू आणि हरभरा या पिकांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. घरातील कुटुंबापुरते धान्य पिकवण्याकडे कल वाढत असल्याने गहू आणि हरभरा या रब्बी हंगामातील पिकांची घट होताना दिसत आहे.

पश्चिम भागात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. सोमेश्वरनगर, चौधरवाडी, करंजे, निंबुत, मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, होळ आदी परिसरात गहू आणि हरभरा पिके बहरली असून वाढलेल्या थंडीचा फायदा या पिकांना होत आहे. गहू आणि हरभरा धान्याचे दर वाढले असून शेतकर्‍यांना पिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

हवामान बदलाचा परिणाम या पिकांवर जाणवत असून खते, औषधे यांचा वापर करून शेतकरी पिकांची काळजी घेताना दिसत आहेत. यांत्रिकीकरणामुळे गहू काढणे सोपे झाल्याने मजुरांचा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत नाही. गव्हाच्या शेतात सध्या तण काढण्याचे काम सुरू आहे. वीजपुरवठा सुरळीत असल्याने शेतकर्‍यांना शेताला पाणी देण्यास सध्या तरी अडचण जाणवत नाही. बारामती, लोणंद, फलटण आदी बाजारपेठा जवळ असल्याने शेतमाल विकण्यास शेतकर्‍यांना सोपे जात आहे.

Back to top button