पुणे : सुमारे 9 हजार प्रेक्षकांनी पाहिले नाटक | पुढारी

पुणे : सुमारे 9 हजार प्रेक्षकांनी पाहिले नाटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय…वेगळ्या धाटणीच्या विषयांची मांडणी….नेपथ्यातील वेगळेपण अन् कलाकारांचा उत्साह…असे वातावरण यंदाच्या 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत पाहायला मिळाले. बुधवारी (दि.7) प्राथमिक फेरी संपली. जवळपास 21 दिवस भरत नाट्य मंदिरात रंगलेल्या या स्पर्धेतील नाटके सुमारे 9 हजार प्रेक्षकांनी पाहिली अन् कलाकारांच्या अभिनयाला अन् नाटकातील मांडणीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

तरुणाईच्या कलागुणांना वाव देणार्‍या अन् व्यासपीठ देणार्‍या राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरी बुधवारी (दि.7) संपली. शेवटी जगणं महत्त्वाचं या नाटकाने प्राथमिक फेरी संपली अन् नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली.

बावळेवाडी या नाटकाने 15 नोव्हेंबरला प्राथमिक फेरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर अहो, ऐकताय,ना??, मु.पो.केळेवाडी, अस्वस्थ वल्ली, आणि हे शहर सुद्धा, ठिय्या असे विविध नाटक प्राथमिक फेरीत सादर झाले अन् प्रत्येक नाटकाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. कलाकार सहदिर्ग्शक प्रेम माहिते म्हणाले, की प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे कुठेतरी नाटक थांबले होते. पण, सर्व काही सुरळीत झाल्यानंतर आता स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद खूप काही सांगणारा होता.

Back to top button