

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : भल्या पहाटे चार चाकी अलिशान गाडीमध्ये भरधाव वेगाने येऊन जवळ असलेल्या छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून दोन चिंकारा हरणांची शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर हरणांना गाडीत घालून पसार झाल्याची घटना शनिवारी १८ सप्टेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या ठिकाणी घडली.
याबाबत प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने सांगितले की, शेतातून येत असताना मोठा आवाज झाल्याने मी वनीकरणातील चारचाकी वाहनाकडे पाहिले असता त्यातून बंदुकीतून चिंकारा हरणाला गोळी झाडल्याचे दिसले. त्यातील ३ जणांनी गाडीतून उतरून हरणास गाडीत घातले.
तिथेच दुसऱ्या 100 फुटाच्या आतच असलेल्या दुसऱ्या एका शेतातील कामगाराने ही दुसऱ्या चिंकाराची शिकार करताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शी युवकांनी सांगितले. दोन्हीही बंदुकीच्या साहाय्याने शिकार केलेली हरणे गाडीत टाकून भरधाव वेगाने वाहन निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात चिंकारा हरणांची संख्या असून हे वैभव वाचवण्यासाठी मागील वीस वर्षापासून आम्ही काम करत असून या शिकाऱ्यांचा छडा लावून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी इंदापूर तालुका चिंकारा बचाव अभियानाचे प्रमुख भजनदास पवार यांनी केली.
शिकार झाली या ठिकाणच्या परिसराचा पंचनामा केला असून येथीलच एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात देखील हे वाहन दिसले आहे. तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास तातडीने लावू असे इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांनी सांगितले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात चिंकारा हरणांची संख्या आहे. यांचा अधिवास जपण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच हरणांची शिकार होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे या बंदूकधारी शिकार्यामुळे परिसरातील शेतकरी ,कामगार ,नागरिक देखील भयभीत झाले आहेत. या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="39600"]