खोर : भुयारी मार्ग, उड्डाणपूल ठेवलाय दडपून | पुढारी

खोर : भुयारी मार्ग, उड्डाणपूल ठेवलाय दडपून

रामदास डोंबे :

खोर : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील भांडगाव येथील चौक हे अपघाताचे ठिकाण झाले असल्याने येथे नियोजनात असलेला, परंतु राजकारण्यांनी दडपून ठेवलेला उड्डाणपूल, भुयारी मार्ग तातडीने होण्याची गरज निर्माण झाली आहे.
या महामार्गावर येणार्‍या प्रत्येक गावाच्या चौकामध्ये भुयारी मार्ग व उड्डाणपूल करण्यात आले. भांडगाव चौकातही भुयारी मार्ग, उड्डाणपूल होणार होता. त्याला मंजुरी मिळाल्याबद्दल येथील ग्रामसभेत अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.त्या आराखड्यातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल अचानक रद्द झाल्याने भांडगावकरांना अनेक पातळ्यांवर प्रयत्न करावे लागत आहेत.

जमीन अधिग्रहणाला संबंधित शेतकर्‍यांनी विरोध केल्याने भुयारी मार्ग, उड्डाणपुलाचा विषय मागे पडला गेला, असे सांगितले जाते. परंतु एवढ्या मोठ्या मार्गाचे भूसंपादन निरनिराळ्या मार्गाने काढणार्‍यांचे घोडे नेमके येथेच का पेंड खातेय, हे काही समजत नाही. येथील वारंवारच्या अपघाताने हा विषय चर्चेचा गेला.  खोर फाटा, खुटबाव फाटा व भांडगाव फाटा येथील अंतर दोनशे ते तीनशे मीटर आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग, उड्डाणपूल व्हावा हा विषय आता जोर धरू लागला. यासाठी दोनदा रास्ता रोकोदेखील करण्यात आला. मात्र भुयारी मार्ग, उड्डाण पूल काही होईना आणि अपघात काही थांबेनात.

राजकीय नेतृत्वाला उड्डाणपूल, भुयारी मार्गाचा विषय मार्गी लावण्यात यश आले नाही, ही मोठी खंत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता होती त्यावेळी आणि सध्या असूनदेखील नुसत्या घोषणांचा पाऊस पडत आहे. सन 2013 पासून भांडगाव फाट्यावर शेकडो अपघात होऊन अनेक लोकांचे जीव गेले आहेत. कित्येक जणांचे प्रपंच या भुयारी मार्गाच्या अभावामुळे उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरले आहे.

विद्यार्थ्यांवर कृपा करा

भांडगाव गावातील रोकडोबानाथ विद्यालयात लहान मुले रस्ता ओलांडताना मोठी सावध भूमिका घेऊन ये- जा करावी लागत असते. भविष्यातील या सर्व गोष्टींचा विचार करून भुयारी मार्ग होणे अपेक्षित आहे. भुयारी मार्ग विषय मार्गी लागला तर सततचे होणारे अपघात थांबण्यास मदत होणार आहे. भविष्यातील प्रस्तावित विस्तारीकरणामध्ये तरी येथील भुयारी मार्ग निश्चित करावा, अशी आमची मागणी असून, यासाठी जे जे काही लागेल त्या सर्व गोष्टी पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील.

                                   -नितीन दोरगे, माजी उपसभापती, दौंड पंचायत समिती

डीपीआरमध्ये पुणे जिल्ह्यातील हडपसरपासून ते पाटसपर्यंत जेवढी अपघातप्रवण क्षेत्रे आहेत, ती सर्व ठिकाणे घेण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग विषय मार्गी लागून अपघातप्रवण क्षेत्र कमी करण्याचा आमचा प्रयत्न असून, लवकरच ही कामे मार्गी लागली जाणार आहेत.
                                                    -राहुल कुल, आमदार, दौंड

Back to top button