वेल्हे : वन्यप्राण्यांच्या त्रासाने रब्बीचे क्षेत्र घटले | पुढारी

वेल्हे : वन्यप्राण्यांच्या त्रासाने रब्बीचे क्षेत्र घटले

वेल्हे : राज्यातील दुर्गम डोंगराळ वेल्हे तालुक्यातील तोरणा, अंत्रोलीसह रायगड जिल्ह्यालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांच्या त्रासाने यंदा रब्बी पिकांचे क्षेत्र जवळपास 15 टक्के घटल्याचे चित्र पुढे आले आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचा फटका दुर्गम भागातील शेतकर्‍यांना बसला आहे.  वेल्हे तालुक्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 70 टक्के क्षेत्रावर भातपिके घेतली जातात. भातपिकांची कापणी केल्यानंतर रब्बी हंगामात भातखाचरांत गहू, हरभरा, मसूर आदी पिके घेतली जातात. मात्र ,अलिकडच्या आठ ते दहा वर्षांपासून रानडुक्कर, मोर व इतर वन्यप्राणी, पक्ष्यांचा उपद्रव वाढला आहे. रातोरात गहू, हरभरा आदी रब्बी पिके वन्यप्राणी, मोर, लांडोर आदी उद्ध्वस्त करीत आहेत.

शेताच्या चहूबाजूंना डोंगर आहेत. ओढे, नाले, नद्या, गुंजवणी, पानशेत अशा धरणांचा परिसर आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांत झाडेझुडपे, जंगले वाढली आहेत. पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात वन्यप्राणी, पक्षी खाद्यासाठी जंगलाशेजारच्या शेतात असलेल्या गहू, हरभरा अशा रब्बी पिकांत शिरून नासाडी करीत आहेत. दरवर्षी असे प्रकार सुरू असल्याने यंदा अंत्रोली, घिसर, शिरकोली आदी ठिकाणी अनेक शेतकर्‍यांनी रब्बी पिकांची पेरणी  केली नाही.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. पिकांच्या नुकसानाची वन खात्याकडून तुटपुंजी भरपाई दिली जाते. बियाणे, मजुरीचा खर्चाच्या दहा टक्केही भरपाई मिळत नाही. दुसरीकडे वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील 20 ते 25 टक्के रब्बीचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करून प्रशासनाने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी.
नानासाहेब राऊत, शेतकरी, अंत्रोली

पावसाळ्यात वनप्राण्यांच्या उपद्रवाने भातपिकाचे नुकसान झाल्याचे प्रकार घडले. मात्र, रब्बी पिकांच्या नुकसानाची माहिती नाही. वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केले असल्यास त्याचे पंचनामे करण्यात येणार आहेत.
बंडू खरात, वनरक्षक, पानशेत वन विभाग

गुंजवणी धरण भागातील अंत्रोली, घिसर, घेवडे, विहीर भागासह पानशेत धरण भागातील वरघड, आंबेगाव, धिंडली भागात रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे यंदा काही शेतकर्‍यांनी रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील रब्बीचे क्षेत्र 10 ते 15 टक्के कमी झाले आहे. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात रब्बीच्या क्षेत्रात यंदा दहा टक्के वाढ झाली आहे. काळा वाटाणा, ज्वारी तसेच भाजीपाला पिके यंदा वाढली आहेत.

धनंजय कोंढाळकर, तालुका कृषी अधिकारी, वेल्हे

Back to top button