शिक्रापूर : रान, उदमांजरांची पिले, बिबट बछड्यांना घाबरू नका, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे आवाहन | पुढारी

शिक्रापूर : रान, उदमांजरांची पिले, बिबट बछड्यांना घाबरू नका, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे आवाहन

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या शेतातील ऊसतोडणीचे काम सुरू असून, शेतात ऊस तोडत असताना बिबट्या, उदमांजर, रानमांजरांची पिले आढळून येत असतात. यामुळे शेतकरी भयभीत होतात. मात्र शेतकरी व ऊसतोड कामगारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे. कोठेही रानमांजर, उदमांजरांची पिले, बिबट्या आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी त्या मांजरांची आई आल्यास नागरिकांना त्यापासून काहीही धोका नसतो. परंतु शेतकरी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणत गैरसमज असल्याने गोंधळ उडून जातो.

कोठेही शेतात कोणता वन्यजीव आढळून आल्यास वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वन्यजीव बचाव समितीचे सदस्य तातडीने त्या ठिकाणी हजर होत असतात. त्यामुळे कोठेही शेतात वन्यजीव आढळून आल्यास शेतकर्‍यांनी घाबरून न जाता या वन्यजीवांच्या पिलांना कोणताही त्रास न देता वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहनदेखील शिरूर वनविभागाच्या वतीने शिरूर वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.

बिबट्याचे पिलू हे पूर्णपणे बिबट्याप्रमाणेच दिसत असून, त्याच्या अंगावर खाकी रंगात पूर्ण अंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. रानमांजर हे राखाडी रंगाचे तसेच तिच्या संपूर्ण अंगावर काळ्या रंगाचे ठिपके किंवा काळ्या रंगाच्या रेषा असतात, तसेच पाळीव मांजराप्रमाणे शरीर व कान दिसून येतात. उदमांजर हे पूर्ण काळ्या रंगाचे असून तोंडाचा भाग निमुळता व चपटा असतो, ते काळपट तपकिरी रंगाचे तसेच अंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात.

Back to top button