रिक्षात आलेल्या तिघांचा पिंपरी परिसरात धुडगूस | पुढारी

रिक्षात आलेल्या तिघांचा पिंपरी परिसरात धुडगूस

पिंपरी : गुन्ह्यात नाव घेतल्याचा राग मनात धरून एका सराईत गुन्हेगाराने दोन साथीदारांच्या मदतीने पिंपरी परिसरात धुडगूस घातला. लिंक रोडवरील पत्राशेड आणि भाटनगर, बौद्धनगर अशा तीन ठिकाणी हवेत गोळीबार करीत परिसरात दहशत पसरवली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. शाहरुख शेख, असे संशयित आरोपीचे नाव आहे. शाहरुख याच्यावर गंभीर गुन्ह्यांची  नोंद आहे.
शाहरुख याच्या भावावर एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दहशत पसरवण्यासाठी शाहरुख सुरुवातीला साथीदारांना घेऊन एका किरणामाल दुकानात गेला. सीसीटीव्ही का लावले असे म्हणत त्याने दुकानदाराला हाताने मारहाण केली.

त्यानंतर पावणेसहा वाजताच्या सुमारास रिक्षातून पुढे पत्राशेडमधील आतील परिसरात जाऊन त्याने चार गोळ्या हवेत झाडल्या. त्यानंतर तो तेथून भाटनगर येथे गेला आणि हवेत दोन गोळ्या झाडल्या. अचानक 500 मीटर अंतरावर घडलेल्या या घटनेने एकच घबराट पसरली. त्यानंतर त ेथून निघून जाताना आरोपींनी बौद्धनगर येथे हवेत एक गोळी झाडली. भाटनगर परिसरात गोळीबार झाल्यानंतर तेथील नागरिकांनी पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील, स्वप्ना गोरे आदींसह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

सीसीटीव्हीत बंद करण्यासाठी धमकी

आरोपींनी केलेला राडा एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. आरोपींनी काही दुकानदारांना धमकावत सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायला लावले.

सीसीटीव्ही नावालाच
भाटनगर परिसरात महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला असता कॅमेरे बंद असल्याचे समोर आले. आरोपी दहशत माजवत जाताना आरोपींनी एका युवकाचा मोबाईल देखील हिसकवला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांची पाच पथके आरोपींना पकडण्यासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली.

पोलिस आयुक्त ठाण मांडून
घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे शाखेसह अन्य पथकांना तत्काळ आरोपी शोधून आणण्याचे आदेश दिले. ते स्वतः चिंचवड ठाण्यात ठाण मांडून होते.

Back to top button