आकुर्डी रेल्वे स्थानकासमोर खाऊगल्ली , पावणेचार कोटींचा करण्यात येणार खर्च | पुढारी

आकुर्डी रेल्वे स्थानकासमोर खाऊगल्ली , पावणेचार कोटींचा करण्यात येणार खर्च

पिंपरी : इंदूर पॅटर्नच्या धर्तीवर पालिकेच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत खाऊ गल्ली उभारण्यात येणार आहे. केवळ तीन महिन्यांत उभारण्यात येणार्‍या या खाऊ गल्लीसाठी तब्बल 3 कोटी 70 लाख 23 हजार 603 रूपये खर्च करण्यात पालिका करीत आहे.

शहरातील विविध भागांत उपक्रम

पालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी इंदूर पॅटर्न राबविला जात आहे. त्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील हे आग्रही होते. शहरातील विविध भागांत खाऊ गल्ली सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात येत आहे.
आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत खाऊ गल्ली उभारण्यासाठी पालिकेच्या स्थापत्य विभागाने 4 कोटी 94 लाख 43 हजार 227 खर्चाची निविदा काढली होती. त्यासाठी 7 निविदा प्राप्त झाल्या. त्यातील देव कॅन्स्ट्रक्शन, पृथ्वी एंटरप्रायजेस, एचसी कटारीया, एसअ‍ॅण्ड जे बिल्डीकॉन, एजी असोसिऐटस व मंजूलाला कॅन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा पात्र ठरल्या. त्यात लघुत्तम 26.77 टक्के कमी दराची देव कॅन्स्ट्रक्शनची 3 कोटी 70 लाख 23 हजार खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

तीन महिन्यांत होणार उभारणी

ही खाऊ गल्ली अवघ्या तीन महिन्यांत उभारण्यात येणार आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

आयुक्तांच्या बदलीनंतर निगडीतील उपक्रम बंद

मोठा गाजावाजा करीत निगडीतील टिळक चौकातील उड्डाण पुलाखाली खाऊ गल्ली सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या खाऊ गल्लीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. आयुक्तांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी पालिकेने पाणी, वीज, स्वच्छता व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध दिले नाही. त्यावरून विक्रेते व प्रशासनात वाद झाल्याने ती खाऊ गल्ली काही महिन्यांतच बंद पडली. तेथील सर्व विक्रेते पूर्वीप्रमाणे रस्त्यावर उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही विक्रेते थेट स्मार्ट सिटीच्या कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरच्या प्रवेशद्वारावरच थांबत असल्याचे चित्र आहे.

Back to top button