पुणे : गुरुवार पेठेत लपले आहे एकमुखी दत्ताचे 350 वर्षे जुने मंदिर | पुढारी

पुणे : गुरुवार पेठेत लपले आहे एकमुखी दत्ताचे 350 वर्षे जुने मंदिर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुरुवार पेठेतील धनगर आळीत तब्बल 350 वर्षे जुने एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. खूप अरुंद बोळात हे मंदिर असल्याने त्याची माहिती लोकांना नाही. मात्र या भागातील तरुणांनी एकत्र येत या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे.
शहरातील गुरुवार पेठेतील हे मंदिर संपूर्ण सागवानी लाकडात होते. मंदिरासमोर सभामंडपही होता, मात्र त्याची गेल्या 350 वर्षांत मोठी पडझड झाली. आज संपूर्ण मंदिर जीर्ण झाले असून, मोडकळीस आले आहे.

दत्तजयंतीनिमित्त येथे त्या काळापासून जन्मोत्सव होतो. कोथमिरे घराण्यात सन 1749 मध्ये गंगानाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील यसाजी बुवा हे पांडुरंगाचे भक्त होते. पंढरीला आषाढी वारीला ते नियमित जात. त्यांच्या घराण्याचा मेंढी, बकरी पाळणे हा चरितार्थाचा उद्योग. गंगानाथ महाराजदेखील मोठे झाल्यावर शेळ्या- मेंढ्या चरायला नेत. तेथे रानातच ते ध्यान करीत. स्वारगेटजवळ नाथ संप्रदायाच्या गोसाव्यांचा मठ होता. तेथे गंगानाथ महाराज प्रवचन ऐकत. तेथेच त्यांना गोपाळनाथ महाराज हे गुरू भेटले आणि त्यांचे जीवन बदलून गेले. ते नाथ संप्रदायी बनले.

चंद्रभागेत सापडली दत्तमूर्ती…

गंगानाथ महाराज पंढरपुरात गेले असताना त्यांना चंद्रभागेत एकमुखी वालुकामय दत्तमूर्ती सापडली. ती त्यांनी गुरुवार पेठेत स्थापन केली. त्या काळापासून या ठिकाणी दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात होतो. त्या काळात मंदिर परिसर मोठा होता. पण हे दत्त मंदिर खूप छोटेसे आहे. त्यासमोरच गंगानाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. मात्र आज मंदिर व परिसराची खूप पडझड झाली आहे. चहूबाजूंनी घरे झाल्याने मंदिर त्या गर्दीत लपले होते. या भागातील तरुणांनी एकत्र येत मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे. या ठिकाणी दुमजली दत्त मंदिराची पायभरणी झाली असून, दोन वर्षांत ते बांधून पूर्ण होणार आहे. बुधवारी या ठिकाणी दत्तजन्म सोहळा होणार असून, गुरुवारी महाप्रसाद होईल.

मी बालपणापासून या मंदिराच्या सेवेत आहे. स्थापत्य अभियंता असल्याने या मंदिराची दुरवस्था पाहावत नव्हती. हळूहळू भक्तांनी एकत्र येत मंदिराचा कायापालट करण्याचा संकल्प केला. लवकरच एकमुखी दत्ताचे दुमजली मंदिर या जागेत साकारणार आहे.
                     -सिद्धेश काबंळे, अध्यक्ष, संत गंगानाथ महाराज मठ ट्रस्ट मंदिर

 

Back to top button