पुणे : दत्त जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम | पुढारी

पुणे : दत्त जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विविध धार्मिक उपक्रमांनी अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी बुधवारी (दि. 7) शहरातील मंदिरांमध्ये श्री दत्त जयंती भक्तिपूर्ण वातावरणात साजरी होणार आहे. सायंकाळी मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने दत्तजन्म सोहळा पार पडणार असून, यानिमित्ताने मठ-मंदिरांमध्ये भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. श्री दत्त जयंतीसाठी मंदिरांमध्ये विद्युतरोषणाई, सजावट केली आहे. दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी मंदिरे विद्युतरोषणाईने झगमगली होती.

शहरातील श्री दत्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे. दिवसभर वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून अभिषेक, महापूजा-आरती, दत्तयाग, सत्यनारायण पूजेचेही आयोजन केले आहे. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे 125 व्या दत्त जयंती सोहळ्यांतर्गत दत्त जयंतीनिमित्त बुधवारी पहाटे 6 पासून मंदिर खुले राहणार असून, संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दत्त मंदिराला विविधरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी 6.30 वाजता लघुरुद्र, त्यानंतर श्री दत्तयाग होईल. सकाळी 8.30 वाजता प्रात:आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग थोरवे आणि वर्षा थोरवे यांच्या हस्ते तसेच दुपारी 12.30 वाजता राजकुमार चोरडिया व कुटुंबीयांच्या हस्ते माध्यान्ह आरती होईल. दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी 5 वाजता असून, सायंकाळी 5.55 वाजता दत्तजन्म सोहळा पार पडेल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता पालखीची नगरप्रदक्षिणा आयोजित केली आहे. रात्री 10.30 वाजता मंदिरात पारंपरिक पालखी व पदे होतील.

श्रीमंत जगद्गुरू श्री शंकराचार्य मठामध्ये सायंकाळी 5 वाजता श्री दत्तजन्म सोहळा पार पडणार आहे. पारंपरिक पद्धतीने जन्मसोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर आरती व प्रसाद वितरण देखील होईल.

Back to top button