चाकण : अल्पवयीन मुलाचे तरुणीकडून लैंगिक शोषण | पुढारी

चाकण : अल्पवयीन मुलाचे तरुणीकडून लैंगिक शोषण

चाकण/महाळुंगे इंगळे : पुढारी वृत्तसेवा : मुलींचे लैंगिक शोषण होण्याच्या घटना समोर येत असताना चाकण औद्योगिक भागात चक्क एका तरुणीने 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलगा अल्पवयीन आहे, हे माहीत असताना देखील त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीवर महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चाकणजवळील खराबवाडी (ता. खेड) परिसरात घडला.

याप्रकरणी महाळुंगे पोलिसांत सोमवारी (दि. 5) फिर्याद देण्यात आली असून, 20 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संबंधित तरुणीची ओळख झाल्यानंतर ते फोनवरून बोलत होते. या वेळी पीडित अल्पवयीन मुलाला तरुणीने फिरायला जाण्यासाठी बोलावले. त्यानुसार मुलगा व तरुणी खराबवाडीजवळील पेट्रोल पंपाजवळ भेटले व चालत-चालत एका शेताजवळ गेले व बसले. तेथे तरुणीने पीडित मुलाशी गैरवर्तन करीत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले.

यावरून महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, महाळुंगे पोलिस सदर प्रकरणाचा तपास करीत असून, या घटनेला आणखी काही कंगोरे असल्याची बाब पोलिस वर्तुळातून समोर आली आहे. यातील आरोपी तरुणी या घटनेनंतर गर्भवती झाली असून, फिर्यादी अल्पवयीन असल्याने त्याची तक्रार पोलिसांना नाकारता येत नसल्याची बाब समोर आली आहे.

Back to top button