

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहराच्या निवासी भागातील जुनी बंद राहती घरे, वाड्यांची कुलपे, कडीकोयंडे तोडून या घरांमधील जुन्या वस्तूंची चोरी करण्याच्या उद्देशाने अशी घरे फोडण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. परिणामी, घरमालकांची चिंता वाढली आहे. शहरात पोलिसांची रात्र गस्त सुरू असतानाही वारंवार असे प्रकार घडत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
जुन्नर येथे जुन्या घरांची, वाड्यांची संख्या मोठी असून, वर्दळीच्या व निवासी भागात ती अनेक वर्षांपासून आहेत. या घरांचे मालक हे बाहेरगावी राहत असल्यामुळे त्यांनी आपली घरे, वाडे कुलूपबंद करून सुरक्षितपणे ठेवलेली असतात. परंतु, काही दिवसांपासून या बंद असलेल्या घरांकडे चोरट्यांची नजर जाऊन रात्रीच्या वेळी या घरांची कुलपे, कडीकोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश करीत घरातील कपाटे, खोल्यांमध्ये उचकापाचक करून घरातील जुन्या वस्तूंची चोरी केली जात आहे.
अशा पद्धतीच्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अशा बंद घरांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने या घरांच्या व वाड्यांच्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आपल्या घरांमध्ये अशा पद्धतीने चोरीचे प्रकार घडल्याने पुन्हा नवीन कडीकोयंडे व इतर दुरुस्तीचा नाहक त्रास घरमालकांना सहन करावा लागत आहे. जुन्नर पोलिसांच्या वतीने रात्रगस्त सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रगस्त सुरू असतानाही निवासी भागातील अशा घरांमध्ये वाड्यांमध्ये चोरीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालून पोलिसी खाक्या दाखवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.