मंचर : लाखो शेतकर्‍यांची पतसंस्थांकडून फसवणूक : किरीट सोमय्या यांची माहिती | पुढारी

मंचर : लाखो शेतकर्‍यांची पतसंस्थांकडून फसवणूक : किरीट सोमय्या यांची माहिती

मंचर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लाखो शेतकर्‍यांना कर्ज देण्याच्या नावाखाली पतपेढ्या आर्थिक शोषण करून फसवणूक करू लागल्या आहेत. फसवणूक, दडपशाहीमुळे अनेक कर्जदारांच्या जमिनी पतसंस्थेने बळजबरीने ताब्यात घेऊन त्यावर बोजा चढविला आहे. अशा पतसंस्थांविरोधात आजपासून माझा संघर्ष सुरू झाला आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 5) दिली.

अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. या वेळी भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, पश्चिम महाराष्ट्रचे प्रमुख जालिंदर कामठे, संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, तालुका संघटक संदीप बाणखेले, मंचर शहराध्यक्ष गणेश बाणखेले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील विविध पतसंस्थांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी कर्जदारांनी कथन केल्या. कर्जदारांच्या अडचणी समजून घेत सोमय्या यांनी पतसंस्थांच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पतसंस्थांकडे कर्ज घेण्यासाठी जातो. याचा फायदा काही पतसंस्थांनी घेतल्याचे येथे आलेल्या तक्रारदारांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कर्जदारांना त्रास देण्याच्याविरोधात यापुढे माझा एल्गार राहील.

सोमय्या म्हणाले की, मंचर येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेने 14 कर्जदारांची तसेच इतर संस्थांनीही कर्जदारांचे शोषण केल्याचे दिसून येते. संबंधित संस्थांचे तीन वर्षांचे स्पेशल ऑडिट झाले पाहिजे. यासाठी मी सहकार विभागाशी बोललेलो आहे. त्याचा पाठपुरावा करीत राहणार आहे.

सहकार खात्यातील अधिकारी आणि पोलिसांनी कर्जदारांच्या अडचणी आणि त्रास देणार्‍या पतसंस्थांविरोधात भूमिका न घेतल्यास मला संबंधित अधिकार्‍यांविरोधात भूमिका घ्यावी लागेल. या पतसंस्थांच्या घोटाळ्यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. पतसंस्था कर्जदारांकडून कर्ज देण्यापोटी कोरे चेक घेत आहे. हा प्रकार संतापजनक आहे. पतसंस्थांना कोरे चेक घेण्याचा अधिकार नाही. सोमय्यांनी मंचर येथील सहायक निबंधक कार्यालय आणि मंचर पोलिस ठाणे, पंजाब नॅशनल बँक येथे भेट दिली.

Back to top button