ओतूर : जिल्ह्यात कांदा लागवड वेगात | पुढारी

ओतूर : जिल्ह्यात कांदा लागवड वेगात

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे आगर म्हणून ओळख असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील क्षेत्रात कांदा लागवडीला वेग आला आहे. लागवडीसाठी मजूर जमविणे, पाणी व्यवस्थापन, कांदारोप उपलब्धता आदी कामांत ओतूर परिसरातील शेतकरीवर्ग व्यस्त झाला आहे.
कांद्याला गेल्या तीन वर्षांत योग्य बाजारभाव मिळालेला नाही. याही वर्षी कांदा पिकाला बाजारभाव मिळेलच, याची कोणतीही खात्री नसतानाही शेतकरी कांदा लागवड करीत आहे. परतीच्या पावसाने कांदारोपे नष्ट झाली होती. बियाण्यांचा महागडा खर्च पेलून पुन्हा रोपे तयार करून पुन्हा कांदा लागवड सुरू करण्यात आली आहे.

खते, औषधे, मजुरीचे, वाहतुकीचे, डिझेलचे वाढलेले भाव, यामुळे कांदा लागवडीचा एकरी खर्च 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. परंतु, लागवड खर्चाच्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने लागवडीवर केलेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button