शिर्सुफळला वानराच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू | पुढारी

शिर्सुफळला वानराच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : शिर्सुफळ (ता. बारामती) येथे रविवारी (दि. 4) वानराच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्याने वानराला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. जागोजागी पिंजरे लावण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात कुत्र्याच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाला होता. वन खात्याकडून अशा घटना घडू नयेत, यावर उपाय योजनांची मागणी प्राणिप्रेमी करीत आहेत. शिर्सुफळ गावात माकडांचे अस्तित्व बर्‍याच वर्षांपासून आहे.

हे माकडांचे गाव म्हणून ओळखले जाते. शिरसाईदेवीचे रक्षक तसेच गावचे रक्षक, अशी माकडांची ओळख आहे. गावकर्‍यांकडून व महाराष्ट्रतून देवीच्या दर्शनासाठी तसेच माकडांना खाऊ देण्यासाठी भाविक येत असतात. त्यामुळे माकडांवर हल्ले झालेले येथील ग्रामस्थांना सहन होत नाही.

वारंवार अशा घटना या ठिकाणी होत आहेत. वन विभाग तसेच प्रशासनाकडून लवकरात लवकर कुत्री व वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा.
                                                                      साहिल काझी, प्राणिप्रेमी.

आम्ही आज रेस्क्यू टीमला बोलावले आहे. लवकरात लवकर या वानराला ताब्यात घेतले जाईल. तसेच अशी घटना होणार नाही, याकडे लक्ष देण्यात येईल.

                                                                                  अनिल माने, वनरक्षक

Back to top button