पुणे : बालकुमार साहित्य संस्थेमध्ये फूट; संस्थेपासून वेगळे होण्याचा काही शाखांचा पवित्रा

पुणे : बालकुमार साहित्य संस्थेमध्ये फूट; संस्थेपासून वेगळे होण्याचा काही शाखांचा पवित्रा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सर्वसाधारण सभेत शाखेच्या आजीव सदस्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आल्यामुळे संस्थेत फूट पडली आहे. काही सदस्यांनी निवडणूक प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचे सांगत धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्याचे जाहीर केले आहे, तर काही शाखांनी संस्थेपासून वेगळे होण्याचा पवित्रा घेतला आहे.

संस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी (दि.4) पार पडली. मात्र निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य पद्धतीने राबविण्यात येत असल्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला. यातच उदगीर, नांदेड, जालना ,परभणी, औरंगाबाद आणि सातारा या संस्थेच्या सहा शाखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आल्यामुळे शाखेच्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही संस्थेला मदत केली आणि आम्हालाच मतदान नाकारण्यात आल्याचा सूर शाखांनी आळविला आहे.

दरम्यान, काही सदस्यांनी संस्थेने घटनाबाह्य पद्धतीने राबविलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्याचे जाहीर केले आहे. तर माधव राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मक मराठी बालसाहित्य महामंडळ, महाराष्ट्र पुणे या राज्यव्यापी संस्थेची घटकसंस्था/संलग्न संस्था म्हणून वेगळी संस्था सुरू करण्याला काही शाखांनी पाठिंबा दर्शविला आहे.

शाखेमार्फत पाच वर्षांपासून आम्ही संस्थेसाठी काम करीत आहोत. आम्हालाच मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला हे चुकीचे आहे. शाखा म्हणून संस्थेपासून वेगळे होण्याचा विचार सुरू आहे. चर्चा करून त्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल.

                                                                       – डॉ. सुहास सदाव्रते,
                                                                             जालना शाखा

सध्याच्या कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे नियमानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणुकीच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी स्थापित करावी, हा आग्रह होता. त्यांनी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रत्यक्षात विहित पद्धतीने निवडणूक झाली नाही. अनेक मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले. शाखांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही, त्यामुळे मूळ संस्थेपासून शाखांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

                                                       माधव राजगुरू, पूर्व उपाध्यक्ष,
                                                           बालकुमार साहित्य संस्था

संस्थेच्या सर्वसाधारण सभेत शाखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे. ते आम्हाला पटलेले नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीतही शाखा सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो, तसा इतर संस्थांच्या शाखा सदस्यांनादेखील असायला हवा. त्यामुळे शाखांनाच मतदानाचा अधिकार नाकारणे हे चुकीचे आहे

                                                           – शिल्पा शिरीष चिटणीस,
                                                                  सातारा शाखा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news