‘वाहतूक’चा कंट्रोल आयुक्तालयाकडेच; येरवड्यातील उपायुक्त कार्यालय हलवण्याबाबत हालचाल

‘वाहतूक’चा कंट्रोल आयुक्तालयाकडेच; येरवड्यातील उपायुक्त कार्यालय हलवण्याबाबत हालचाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथे असलेले शहर वाहतूक शाखा उपायुक्त कार्यालय पुन्हा पोलिस आयुक्तालयात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येरवडा येथे वाहतूक विभागाची इतर कार्यालये व नियंत्रण कक्ष राहणार आहे. तर, उपायुक्त आयुक्तालयात बसून कामकाज पाहणार आहेत. दरम्यान, उपायुक्तांना, नागरिकांना सोईचे व्हावे, वरिष्ठ अधिकार्‍यांची नजर राहावी, म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

येरवडा परिसरातील विमानतळ रस्त्यावर सध्या शहर वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी पोलिस उपायुक्त, प्रशासन पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण कक्ष आहे. चार वर्षांपूर्वी वाहतूक शाखेचे कार्यालय पुणे पोलिस आयुक्तालयात होते. येरवडा येथे वाहतूक विभागाला जागा मिळाल्यानंतर 2018 मध्ये त्या ठिकाणी वाहतूक विभाग हलविण्यात आला. मुख्य कार्यालय येरवडा येथे गेले, तरी नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने व वरिष्ठांची जवळून नजर राहील म्हणून वाहतूक उपायुक्तांचे कार्यालय आयुक्तालयातच असावे, अशी चर्चा होती. पण, ते झाले नाही.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत शहरातील वाहतूक समस्या गंभीर होत गेली. या वर्षी तर वाहतूक समस्यांनी नागरिक खूपच हैराण झाले होते. वाहतूक शाखेचे कार्यालय दूर अंतरावर असल्यामुळे तो एक वेळचा सुभा झाल्याची परिस्थिती होती. तसेच, वरिष्ठांना नियंत्रण ठेवण्यास मर्यादा निर्माण झाल्या होत्या.

वाहतूक विभागाच्या तत्कालीन पोलिस उपायुक्तांच्या कार्यकाळातील वाहतूक शाखेचे कारनामे वरिष्ठांच्या कानावर गेले होते. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी अगोदर एक महिना रस्त्यावरील कारवाई बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही वाहतूक शाखेकडील काम व्यवस्थित होत नसल्यामुळे थेट पोलिस आयुक्तालयातील दुसर्‍या उपायुक्तांना देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्याची वेळ आली होती. एवढेच नाही, तर वाहतूक कोंडीबाबत पोलिस आयुक्त अनेकदा रस्त्यावर उतरले होते.

येरवडा येथील वाहतूक शाखेचे कार्यालय दूर असल्यामुळे नागरिकांना जाण्यास अडचणी येत होत्या. तसेच, कार्यालय दूर असले, तरी उपायुक्त आयुक्तालयात बसल्यास वरिष्ठांची जवळून देखरेख राहील आणि कामात सुधारणा होईल, या दृष्टीने उपायुक्तांचे कार्यालय आयुक्तालयात यावे, अशी मागणी केली जात होती.

त्यानुसार पोलिस आयुक्तांनी वाहतूक शाखेचे कार्यालय आयुक्तालयात आणण्यास हालचाली सुरू केल्या आहेत. वाहतूक शाखेच्या उपायुक्तांसाठी आयुक्तालयात केबीनचे काम करण्याच्या सूचना दिल्याची वरिष्ठ अधिकार्‍यांनी माहिती दिली. पूर्वी गुन्हे शाखेचे उपायुक्त बसत असलेल्या ठिकाणी वाहतूक विभागाच्या उपायुक्तांच्या दालनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक विभागाचे कंट्रोल आयुक्तालयातून होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news