पुणे : सर्व संशोधन संस्थांची विद्यापीठ करणार तपासणी | पुढारी

पुणे : सर्व संशोधन संस्थांची विद्यापीठ करणार तपासणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पीएच.डी. प्रवेश देणार्‍या सर्व संशोधन केंद्रांची शैक्षणिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या तपासणीतून निकष पूर्ण केलेल्या संशोधन केंद्रातच पीएच.डी. प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पीएच.डी. प्रवेश देणार्‍या संशोधन केंद्रातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मुलाखती पूर्ण झाल्यावर उमेदवारांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून पुणे, नगर, नाशिक आणि सिल्वासा येथील संशोधन केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यातून संशोधन केंद्रातील अद्ययावत स्थिती समोर येणार आहे.

प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संशोधन केंद्रांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व संशोधन केंद्रांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून जिल्हानिहाय समिती नियुक्त केली आहे. तसेच, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संशोधन केंद्रांच्या तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सोमवारपासून तपासणी सुरू झाली आहे. 15 डिसेंबरपर्यंत सर्व संशोधन केंद्रांची तपासणी करण्यात येईल. या तपासणीसाठी संशोधन केंद्रांना माहिती सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. संशोधन मान्यता आणि अन्य बाबींची पूर्तता करणार्‍या आणि समितीने शिफारस केलेल्या संशोधन केंद्रांवरच पीएच.डी.चे प्रवेश करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

अशी होणार तपासणी

जिल्हा दिनांक संशोधन केंद्रांची संख्या
नाशिक 5 आणि 6 डिसेंबर 29
नगर 7 आणि 8 डिसेंबर 35
पुणे शहर 9, 10 आणि 11 डिसेंबर 123
पुणे ग्रामीण 12, 13 आणि 14 डिसेंबर 28
एकूण संशोधन केंद्रे : 215

Back to top button