पिंपरी : दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण योजना | पुढारी

पिंपरी : दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण योजना

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील दिव्यांगबांधव व दिव्यांग संघटनांसमवेत सुसंवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी अधिक व्यापक व बदलत्या काळाशी समरुप असलेल्या कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. महापालिकेतर्फे दिव्यांग दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये विविध कार्यक्रम झाले.

त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. उज्ज्वला आंदूरकर, समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, सम्राट सेना दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मिलिंदराजे भोसले, झुंज संघटनेचे अध्यक्ष राजू हिरवे, पिंपरी चिंचवड मूक बधिर संघटनेचे अध्यक्ष परशुराम बसवा आदी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी पालिकेच्या वतीने शहरामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिका कार्यालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय तयार केले जात आहे. बीआरटी मार्गावर रस्ता ओलांडण्याकरिता सोय करण्याची गरज आहे. लहान मुलांचे अपंगत्व हे कमी वयात कळल्यानंतर त्यावर अधिक चांगल्या रितीने उपचार करता येतात. त्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.

अक्षय सरोदे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांसाठी ‘दिव्यांग नागरिकांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. चिंचवड येथील मूकबधिर विद्यालयातील मुलांच्या सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोसरीतील पताशीबाई रतनचंदमानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमात दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती देणारा प्रेरणादायी लघुपट दाखविण्यात आला. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणार्या सामाजिक संस्था तसेच, विशेष प्रावीण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थी व नागरिकांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यालयात दिव्यांगांना सहजतेने पोहोचता यावे अशी व्यवस्था असावी
दिव्यांगांना विविध ठिकाणी सहजतेने पोहोचता यावे, यासाठी व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावे. दिव्यांगांसाठी असणार्‍या योजनांना गती मिळावी. आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसमवेत सुसंवाद असणे गरजेचे आहे, अशी मागणी मानव कांबळे यांनी केली.

Back to top button