ओतूर : १९ वर्षांच्या युवतीवर बिबट्याचा हल्ला; १२ तासात दुसरी घटना | पुढारी

ओतूर : १९ वर्षांच्या युवतीवर बिबट्याचा हल्ला; १२ तासात दुसरी घटना

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : क्लासला पायी जाणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर बिबट्याने पहाटे साडे सहाच्या सुमारास अचानक हल्ला केल्याने युवतीच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असल्याची माहिती ओतूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. हल्ला झाला त्यावेळी युवतीने प्रतिकार करीत आरडाओरड केल्याने बिबट्या पसार झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
ही घटना ६ डिसेंबरला ओतूर जवळील अहिंनवेवाडी परिसरात घडली.

निर्मला किसन वायळ (वय १९ रा. अहिनवेवाडी, ता. जुन्नर) असे हल्ला झालेल्या युवतीचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी वनपाल एम. व्ही. गीते, वनरक्षक खोकले, उदापूर वनरक्षक राठोड यांच्या समवेत घटनास्थळ गाठून जखमी मुलीला उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी पुणे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले आहे.

१२ तासात बिबट्याने केला दुसरा हल्ला
अवघ्या १२ तासात बिबट्याने केलेला हा दुसरा मानवी हल्ला चिंता वाढविणारा असून ओतूर परिसरात बेसुमार वाढलेली बिबट संख्या व मानव बिबट संघर्ष रोखण्यासाठी आंबेगव्हान येथील प्रस्तावित बिबट सफारी कामाला जलदगतीने चालना देण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

Back to top button