पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळेस दांडी 11 अधिकार्‍यांना आयुक्तांची नोटीस | पुढारी

पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळेस दांडी 11 अधिकार्‍यांना आयुक्तांची नोटीस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या जनजागृती कार्यशाळेला आणि बैठकांना दांडी मारणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 7 उपायुक्त, 3 सहायक आयुक्त व एका क्षेत्रीय अधिकार्‍यांस पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कारणा दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. एलबीटी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले, सामन्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्यासह भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे, महफ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ह्युुमन मेट्रीक्स सिक्युरिटीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 जनजागृती कार्यशाळेचे 29 नोव्हेंबरला सकाळी 9 ते 2 या वेळेत चिंचवड येथील ऑटो क्लस्टार हॉलमध्ये आयोजन केले होते. या कार्यशाळेला सर्व विभागाच्या विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याबाबत स्वच्छ महाराष्ट्र अंमलबजावणी कक्षाने 28 नोव्हेंबरला आदेश दिला होता. त्यामुळे या कार्यशाळेला उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांनी उपस्थित रहाणे बंधनकारक होते.

‘तीन दिवसांत लेखी खुलासा सादर करा’

कार्यशाळेस अनुपस्थित राहत या अधिकार्‍यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून कार्यालयीन सुसूत्रतेच्या दृष्टीने उचित नाही. सर्व अधिकार्‍यांवर तरतूदीनुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये?
याचा लेखी खुलासा तीन दिवसात सादर करावा. मुदतीत खुलासा सादर न केल्यास किंवा केलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Back to top button