

नायगाव : वाघापूर(ता. पुरंदर) येथील गायरान जमिनीवर निवासी, शेती, औद्योगिक व इतर प्रयोजनार्थ अतिक्रमण केलेल्या नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण स्वखर्चाने निष्कासित करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. गायरान जमिनीवर आपण बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले आहे, असे निदर्शनास आले आहे. सदरील अतिक्रमण नोटीस मिळाल्यानंतर दहा दिवसांत आपण स्व-खर्चाने निष्कासित करणे गरजेचे आहे.
अगर देण्यात आलेल्या मुदतीत निष्कासित करण्यात आले नाही, तर शासकीय यंत्रणेचा अवलंब केला जाईल, खर्च आपणाकडून जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार गायरानातील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. गायरानातील अतिक्रमण स्थगितीबाबत शासनाचे कोणतेही परिपत्रक मिळालेले नाही. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून वरिष्ठांकडे सादर करणार आहे, असे ग्रामसेवक आर. पी. भोंडे यांनी म्हटले आहे.