शिक्रापूर : पीएमपीएल बस बंद झाल्याने नागरिकांचे हाल | पुढारी

शिक्रापूर : पीएमपीएल बस बंद झाल्याने नागरिकांचे हाल

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएल प्रशासनाने पुणे मनपा ते पाबळ लोणी ही बससेवा बंद केल्याने तसेच एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी ही बससेवा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोरोना काळानंतर शिक्रापूर ते पाबळ या मार्गावरची एसटी बससेवा बंद झाली होती.

यानंतर पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने या मार्गावर बससेवा सुरू झाली. या बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता, परंतु पूर्वकल्पना न देता पीएमपीएलने शनिवार (दि.3)पासून बससेवा बंद केली. बससेवा बंद केल्याची माहिती नसल्याने प्रवासी कित्येक तास बसस्थानकावर बसची वाट पाहताना दिसत होते. विद्यार्थी, कामगार वर्ग व नागरिकांचे बसअभावी मोठे हाल सुरू आहेत. एस. टी. महामंडळानेही या मार्गावर एसटी सुरू न केल्याने प्रवाशांना कुठलेही वाहन उपलब्ध होत नाही.

याबाबत पीएमपीएल प्रशासनाचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पुणे शहरातील नागरिक हे करदाते आहेत, प्राधान्याने त्यांची प्रवासाची व्यवस्था पाहिली जाते. तसेच एसटी महामंडळाने ग्रामीण भागात हरकत घेतली आहे. या मार्गावरील बस फेरीतून उत्पन्नही मिळत नसल्याने बस बंद केल्याचे सांगितले. एसटी सेवेबाबत शिरूर आगाराशी संपर्क होऊ शकला नाही.

हा बससेवेचा मार्ग नफ्यात आहे, तसेच पाबळपर्यंत त्यांची गावे पीएमआरडीच्या हद्दीत येत आहेत, यामुळे प्रशासनाने ही बससेवा त्वरित सुरू करावी, अन्यथा या गावांमधील नागरिकांना घेऊन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी दिला आहे. पाबळीतील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर यांनी परिसरातील गावांमधून शाळा व महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. बससेवा पूर्ववत न झाल्यास विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी होतील, असे सांगितले.

 

Back to top button