चित्रीकरणामुळे मिळतोय रोजगार; भोर बनतेय चित्रपट, मालिकानिर्मात्यांचे आवडते डेस्टिनेशन

चित्रीकरणामुळे मिळतोय रोजगार; भोर बनतेय चित्रपट, मालिकानिर्मात्यांचे आवडते डेस्टिनेशन

अर्जुन खोपडे

भोर : शहरातील संस्थानकालीन राजवाडा, निरा नदीवरील घाट, भाटघर, निरादेवघर धरणाचा निर्सगरम्य परिसर, भोर – महाड रस्त्यावरील दर्यापूल, पुरातन मंदिरे, वाडे, वरंध घाट, काही गावे याठिकाणी अनेक हिंदी – मराठीसह तेलगू, भोजपुरी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सतत सुरू असते. या माध्यमातून भोर शहर आणि तालुक्यातील रोजगाराला चालना मिळाली आहे.

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर शहरात संस्थानकालीन राजवाडा, निरा नदीवरील विविध घाट याशिवाय भोरेश्वर मंदिर, पिसावरे, इंगवली, बसरापूर, उत्रौली, बाजारवाडी, मानकरवाडी, निगुडघर, किवत, बारे, शिंद, महुडे, नांद, शिवरे, किकवी, शिवापूर, केंजळ, भोंगावली, सारोळा, शिंदेवाडी, भोलावडे आदी गावे चित्रपट व मालिकानिर्मात्यांची आवडीची बनली आहेत.

या बरोबरच खंडोबाचा माळ, निरादेवघर, भाटघर धरण परिसर, दर्यापूल, वरंध घाट, राजा रघुनाथराव विद्यालयाची दगडी इमारत, रामबाग येथील स्काऊट गाईड इमारत, आंबवडे येथील झुलता पूल, पांडवकालीन मंदिर, बनेश्वर मंदिर या ठिकाणीही चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होत आहे.

सन 1973 ला अभिनयाचा बादशहा दिलीपकुमार यांच्या बैरागी चित्रपटाचे भोरला चित्रीकरण झाले होते. तेव्हापासून आजवर अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अक्षय खन्ना, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, कुणाल कपूर, प्रवीण तरडे, स्वप्नील जोशी, तुषार दळवी, मोहन जोशी, निळू फुले, दादा कोंडके, मोहन आगाशे, सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, भालचंद्र कदम, मकरंद अनासपुरे, स्मिता तळवळकर, नितीन देसाई, संजय मांजरेकर, आमिर खान, अनुपम खेर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, अमोल कोल्हे, संजय नार्वेकर, सुबोध भावे, रमेश देव, दिपिका पदुकोन, ऐश्वर्या रॉय, सुश्मिता सेन, डिंपल कापडिया या अभिनेत्रींनी चित्रीकरणानिमित्त भोर परिसरात हजेरी लावली आहे. राजकुमार संतोषी, बोनी कपूर, संजय लिला भन्साळी, अमोल कोल्हे आदींचे भोरला प्राधान्य असते.

देऊळ, बालगंधर्व, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, दे धक्का, चंद्रमुखी, फर्जद, पावनखिंड, कट्यार काळजात घुसली, माहेरची साडी, मंगल पांडे, गांधी माय फादर, चल चला चल, लव युव शंकरा,अस्मानी या चित्रपटांचे तर राजा शिवछत्रपती, कुंकु, सोनियाचा उंबरा, राऊ, जिजामाता, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांचे शूटिंग भोरमध्ये झाले आहे.

पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे पुण्यात राहून जाऊन – येऊन शूटिंग करता येते. निर्सगरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वास्तूंमुळे सेट उभारण्यासाठी खर्चही कमी येतो. स्थानिक कलाकार, कामगार कमी मानधनात मिळतात. यामुळे भोरमध्ये येऊन चित्रीकरण करण्याकडे निर्माते व दिग्दर्शक यांचा कल असतो. या माध्यमातून स्थानिक तरुणांना तसेच हॉटेल, लॉज व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

भोर तालुक्यात उद्योग – व्यवसाय नसल्यामुळे तरुणांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागते. मात्र, भोर शहरात व तालुक्यात हिंदी, मराठी चित्रपट व मालिकांचे शूटिंग होऊ लागल्याने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र, शूटिंगची परवानगी काढताना अनेक विभागात जावे लागते. त्यामुळे शासनाने एक खिडकी योजना सुरू करावी.

                                                              – प्रकाश मोरे, कलाकार व दिग्दर्शक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news