पुणे : सहा हजार अर्जांची आज होणार छाननी; ग्रामपंचायत निवडणूक | पुढारी

पुणे : सहा हजार अर्जांची आज होणार छाननी; ग्रामपंचायत निवडणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी 1 हजार 50, तर सदस्यपदांसाठी 5 हजार 107 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (दि. 5) सर्व संबंधित तहसील कार्यालयांत अर्जांची छाननी होणार आहे. तर, आर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर आहे. त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करावे लागणार होते. मात्र, सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी प्रत्यक्ष पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अर्जाची एकत्रित माहिती गोळा करण्यास जिल्हा प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत कसरत करावी लागली.

मुळशीतील ग्रामपंचायतींच्या 88 जागांसाठी सर्वांत कमी 145 अर्ज आले आहेत. इंदापूर तालुक्यात सरपंचपदांसाठी सर्वाधिक 161 अर्ज आले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एक हजार 863 सदस्यपदांसाठी पाच हजार 77 जणांनी पाच हजार 107 अर्ज दाखल केले, तर 221 सरपंचपदांसाठी एक हजार 46 जणांनी एक हजार 50 अर्ज दाखल केले. त्यांची आज छाननी होणार आहे.
भोरमधील 56 ग्रामपंचायतींच्या 382 जागांसाठी 582 अर्ज आले आहेत.

इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमधील 246 जागांसाठी सर्वाधिक 956 अर्ज आले आहेत. वेल्हा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींमधील 196 सदस्यपदांसाठी 284 अर्ज प्राप्त झाले असून, सरपंचपदासाठी 99 अर्ज दाखल झाले आहेत. दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमधील 78 जागांसाठी 268 अर्ज दाखल झाले असून, सरपंचपदासाठी 48 अर्ज दाखल झाले आहेत.

बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, त्यातील 137 सदस्यपदांसाठी 598 अर्ज दाखल झाले असून, सरपंचपदासाठी 108 अर्ज दाखल झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमधील 140 जागांसाठी 334 अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी 71 अर्ज दाखल झाले आहेत. आंबेगावमधील 21 ग्रामपंचायतींच्या 201 सदस्यपदांसाठी 511 अर्ज, तर सरपंच पदासाठी 98 अर्ज दाखल झाले आहेत.

खेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींमधील 193 जागांसाठी 601, तर सरपंचपदासाठी 131 अर्ज दाखल झाले आहेत. शिरूर तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या 40 जागांसाठी 215, तर सरपंचपदासाठी 34 अर्ज दाखल झाले आहेत. मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींमधील 81 जागांसाठी 225, तर सरपंचपदासाठी 51 अर्ज दाखल झाले आहेत. हवेली तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, त्यातील सदस्यपदांसाठी 388 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचपदासाठी 51 जणांनी अर्ज दाखल केला असून, त्या सर्व अर्जांची आज छाननी होणार आहे.

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. त्या दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.

Back to top button