‘लाइट अँड साउंड शो’ अखेर सुरू; शनिवारवाड्याचा इतिहास पर्यटकांना अनुभवता येणार! | पुढारी

‘लाइट अँड साउंड शो’ अखेर सुरू; शनिवारवाड्याचा इतिहास पर्यटकांना अनुभवता येणार!

नितीन पवार

कसबा पेठ : शनिवारवाड्यातील ‘लाइट अँड साउंड शो’ गेल्या काही वर्षांपासून बंद होता. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने अखेर ही यंत्रणा रविवारपासून सुरू केली आहे. त्यामुळे शनिवारवाड्याच्या इतिहासाचा थरार (गाथा छत्रपतींच्या पेशव्यांची) पर्यटकांना अनुभवता येणार आहे. मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती पर्यटकांना होण्यासाठी महापालिकेने सव्वाशे कोटी रुपये खर्चून काही वर्षांपूर्वी शनिवारवाड्यात ‘लाइट अँड साउंड शो’ची यंत्रणा बसवली.

मात्र, कालांतराने महपालिकेच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ही यंत्रणा धूळ खात पडली होती. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने ‘ध्वनी-प्रकाशाचा देखावाच’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने अखेर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामुळे शनिवारवाडा व मराठ्यांचा इतिहास पर्यटकांना समजणार आहे. परिणामी, पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. दैनिक ‘पुढारी’ने पाठपुरावा केल्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शनिवारवाड्यातील हा ‘लाइट अँड साउंड शो’ शनिवारपासून (दि. 3) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी सात वाजता मराठीत व रात्री आठ वाजता हिंदीमधून असे दोनवेळा सादरीकरण करण्यात येईल. रविवारपासून तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे.
                                                        – शिरीष गरुड, ठेकेदार,
                                                 ‘लाइट अँड साउंड शो’ सिस्टिम

Back to top button