वनपुरी गाव निघाले भक्तीरसात न्हाऊन; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता | पुढारी

वनपुरी गाव निघाले भक्तीरसात न्हाऊन; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

दिवे; पुढारी वृत्तसेवा : ‘ज्ञानोबा तुकाराम‘चा अखंड जयघोष, टाळ- मृदंगाचा गजर, मंदिरातील विविधरंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यासोबतच तालुक्यातील दिग्गज कीर्तनकारांच्या प्रबोधनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.

काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. वनपुरी (ता. पुरंदर) येथे युवा कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 24 नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत 40 व्या अखंड हरिनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व वारकरी संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. बाबासाहेब गायकवाड यांच्या हस्ते कलश आणि वीणा पूजन करून सप्ताहास सुरुवात झाली.

पहाटे श्री विठ्ठल- रुख्मिणी मूर्तींची महापूजा, काकडा आरती, सकाळी पारायण वाचन, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ आणि त्यानंतर कीर्तन झाले. पहिल्या दिवसापासून ह.भ.प. स्वप्नील काळाने, ह.भ.प. मनोज मोरे, ह.भ.प. ओम झेंडे, तुषार दुरगुडे, ऋतुजा झेंडे, म्हस्कू कामठे, ह.भ.प. अर्पिता पवार यांनी कीर्तन सेवा केली. ह.भ.प. महादेव कुंभारकर यांनी व्यासपीठ चालक म्हणून काम पहिले.

बुधवारी दुपारी चार वाजता फुलांनी सजविलेल्या पालखीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची टाळ मृदंगाच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी महिलांनी संपूर्ण गावातील रस्त्यावरून रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. रात्री संपूर्ण मंदिर आणि परिसरात मेणबत्त्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी ह.भ.प. चैतन्य महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच दहीहंडी फोडून उपस्थित ग्रामस्थांना महाप्रसाद देऊन सांगता करण्यात आली.

श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे ह.भ.प. सुदामराव कुंभारकर, भीमाजी कुंभारकर, देवराम जगताप, संभाजी महामुनी, नामदेव मगर, तुकाराम महामुनी, महादेव कुंभारकर, माणिक कुंभारकर, सुरेश महामुनी आदींनी सप्ताहाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सरपंच नामदेव कुंभारकर, उपसरपंच लंकेश महामुनी, माजी सरपंच नाथाबाप्पू कुंभारकर, रामदास कुंभारकर, वर्षाताई कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर, सुनील कामठे, शांताराम कुंभारकर, पंडित कुंभारकर, सर्जेराव कुंभारकर, मंदिराचे पुजारी जगन्नाथ रूढ, सुमन रूढ यांसह गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button