पुणे : चोरीचा आळ घेऊन युवतीशी अश्लील कृत्य | पुढारी

पुणे : चोरीचा आळ घेऊन युवतीशी अश्लील कृत्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चोरीचा आळ घेऊन महाविद्यालयीन युवतीबरोबर अश्लील कृत्य करून पोलिसात देण्याची धमकी देऊन तिच्याकडील 80 हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. युवतीने याबाबत हरियाना पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित गुन्हा हरियाना पोलिसांनी लोणीकंद पोलिसांकडे तपासासाठी पाठविला आहे. या प्रकरणी दोन तरुणी व तीन तरुण, अशा पाच जणांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या राज्यांतील राहणारे असून, एकाच महाविद्यालयात शिकत आहेत.

याबाबत हरियानामधील सिरसा जिल्ह्यातील एका महिलेने स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेथून तो गुन्हा लोणीकंद पोलिस ठाण्यात आला आहे. फिर्यादीची मुलगी वाघोलीतील एका इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत आहे. वाघोली भागात फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन ती आरोपी दोन तरुणींसोबत राहत होती.17 ऑक्टोबर रोजी त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. त्यामुळे तिने फ्लॅट सोडला. ती शेजारी राहणार्‍या मुलींबरोबर राहू लागली.

दरम्यान, त्या वेळी आरोपी तरुणी व तरुणांनी युवतीला धमकावण्यास सुरुवात केली. युवतीने सोन्याची चैन व लॅपटॉप चोरला असल्याचे सांगून तिचे कपडे उतरवून झडती घेतली. तसेच, याबाबत कोणाला काही सांगितले, तर व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसात देण्याची धमकी देऊन युवतीच्या खात्यातील 80 हजार रुपये आरोपींनी स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले.

आणखी पैशाची मागणी करीत आरोपींनी तिला मारहाण केली. त्यानंतरही तिला आरोपी धमकावत होते. त्यामुळे युवती घाबरली आणि मूळगावी निघून गेली. तिने आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पीडित युवतीच्या आईने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांचा अद्याप संपर्क झालेला नाही, इतरदेखील माहिती घेऊन पोलिस तपास करीत आहेत, असे सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार यांनी सांगितले.

Back to top button