प्रवाशांसाठी महत्वाची बातमी: पीएमपीची लोणावळा बस सेवा बंद | पुढारी

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी: पीएमपीची लोणावळा बस सेवा बंद

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपी प्रशासनाने शहराबाहेरील ग्रामीण अकरा मार्गांसह निगडी-लोणावळ्याचा बारावा मार्ग सुध्दा नुकताच बंद केला आहे. त्यासोबतच आणखी 40 मार्ग बंद करण्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एसटी संपकाळात पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात आपली सेवा सुरू केली होती. मात्र, एसटीचा संप संपला तरी देखील पीएमपीने ग्रामीण भागातील आपली सेवा बंद केली नाही. या संदर्भात एसटी प्रशासनाने तत्कालीन पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांना ही सेवा बंद करावी, अशा मागणीची अनेक पत्र पाठविली. मात्र, मिश्रा यांनी ग्रामीण भागातील मार्ग बंद करण्यास उदासिनता दाखविली. परंतु, सध्याचे पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी एसटी प्रशासनाच्या पत्रांची दखल घेत, तात्काळ ग्रामीण भागातील पीएमपीच्या सेवा बंद केल्या आहेत. ग्रामीण भागातील 40 मार्गांवरील सेवा आता बंद होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 11 मार्ग बंद करण्याचे नियोजन होते. त्यात पीएमपीने आणखी एक मार्गाची भर टाकल्याने ग्रामीण भागातील 12 मार्ग बंद करण्यात आले आहेत. बारावा मार्ग निगडी-लोणावळा हा आहे.

नियमानुसार पीएमपीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरापुरतीच मर्यादित आहे. तर एसटी सेवा राज्यभर पुरविता येते. पीएमपीला महापालिका हद्दीबाहेर जर बससेवा सुरू करायची असेल, तर एसटीची परवानगी घेणे अनिवार्य असते. परंतु, पीएमपीने ग्रामीण मार्ग सुरू करताना कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यामुळे एसटीच्या उत्पन्नाला अजूनही मोठा फटका बसत आहे.

ग्रामीण भागातील बंद झालेले 12 मार्ग…

1) स्वारगेट ते काशिंगगांव
2) स्वारगेट ते बेलावडे
3) कापूरव्होळ ते सासवड
4) कात्रज सर्पोद्यान ते विंझर
5) सासवड ते उरुळीकांचन
6) हडपसर ते मोरगांव
7) हडपसर ते जेजुरी
8) मार्केटयार्ड ते खारावडे/लव्हार्डे
9) वाघोली ते राहुगांव, पारगाव सालु मालू
10) चाकण, आंबेठाण चौक ते शिक्रापूर
11) सासवड ते यवत
12) निगडी ते लोणावळा

Back to top button