जुनी सांगवीतील स्मशानभूमीत मृत्यूनंतरही यातना | पुढारी

जुनी सांगवीतील स्मशानभूमीत मृत्यूनंतरही यातना

दापोडी : जुनी सांगवीतील स्मशानभूमीत नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे अंत्यविधीसाठी शव नेताना अडथळा येत आहे.

शेडचे पाईप तुटले

स्मशानभूमीत अनेक समस्या दिसत आहेत. येण्याच्या मार्गावर रस्ता खड्डेमय आहे, तर काही भागात खचला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शव नेण्यासाठी अडथळा येत आहे. दहन करण्याच्या बाजूचे शेडचे चौरस पाईप तुटले आहेत. तसेच, काही पाइप सडले आहेत. साइडचे ग्रेनाईट लावलेले काही निखळून पडले आहेत.

लोखंडी बेडची दुरुस्ती करा

दहन करण्याचे तीनही लोखंडी बेडची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लाकडे (सरन) रचता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. बोरवेलच्या झाकणाच्या बिजागर्‍या तुटल्या आहेत. कोरोनाच्या काळात जास्त शव आल्यामुळे जमिनीवर शव दहन केले होते. त्यामुळे जमिनीवरील घडवलेले दगड फुटले आहेत. अशा अनेक समस्यांमुळे जुनी व नवी सांगवीतील नागरिकांना अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीला बकालपणा आलेला दिसत आहे.

देखभाल, दुरुस्तीची नागरिकांची मागणी

स्मशानभूमीच्या समस्या सोडविण्याची मागणी ह प्रभागामध्ये जनसंवाद सभेत मनसेच्या वतीने केली होती. मृत्यू हा कुणालाही चुकत नाही. हे शाश्वत सत्य असून, जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सोपस्कर म्हणजे अंत्यसंस्कार. मनुष्याचा शेवट चांगला व्हावा, अशीच धारणा प्रत्येक नातेवाईकांची असते. मात्र, जुनी सांगवी स्मशानभूमीच्या बकाल अवस्थेमुळे मृत्यूनंतरही यातना साथ सोडत नसल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीची योग्य देखभाल, दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी व सांगवी ग्रामस्थांनी केली आहे.

या स्मशानभूमीची स्थापत्य विभागाचे अधिकारी व मी स्वतः पाहणी केली आहे. ज्या अडचणी स्मशानभूमीमध्ये आहेत त्या चार दिवसांत दूर केल्या जातील, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले आहे.
                                                    – संतोष कांबळे, माजी नगरसेवक

जुनी सांगवी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी नागरिक जातात. परंतु, त्या ठिकाणी अडथळ्यांची शर्यत करावी लागते. संबंधित प्रशासनाने पाहणी करून लवकरात लवकर अडचणी दूर कराव्यात.
                                                             – गणेश ढोरे, जुनी सांगवी

Back to top button