

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : कोणतेही आर्थिक पाठबळ व मदत नसताना येणार्या अडचणी तसेच संकटांना सामोरे जात पुण्यातील दोन मावळे युवक छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी दक्षिण भारतात पायी प्रवास करत आहेत. अलिबाग ते कन्याकुमारी असा दीड हजार किलोमीटर अंतराचा प्रवास दोघे पायी चालत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करणार आहेत. महाराष्ट्रासह पाच राज्यांत त्यांचा प्रवास आहे. निरज देवदास गवारे (वय 25, मूळ रा. अहमदनगर, सध्या रा. पुणे) व तुषार दादासाहेब चोरघे (वय 27, मूळ रा. वांगणी, ता. वेल्हे, सध्या रा. हिंगणे खुर्द) अशी या ध्येयवेड्या युवकांची नावे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निस्सीम भक्तीपोटी दोघांनी कोकण, गोव्यापासून दक्षिण भारतात गावोगावी छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय बाण्याच्या विचारांचा जागर करण्यासाठी दि. 5 नोव्हेंबर रोजी अलिबाग येथून पायी प्रवासाला सुरुवात केली. कोकण, गोव्यानंतर दोघे कर्नाटक राज्याच्या समुद्र किनारपट्टीच्या मार्गाने सध्या पायी चालत आहेत. शुक्रवारी (दि. 2) मोरडेश्वर (कर्नाटक) येथील समुद्र किनारा मार्गाने दोघांनी तीस किलोमीटर अंतराचा टप्पा पार केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास मानवंदना देऊन तुषार व निरज शिवरायांचा इतिहास सांगतात. मछत्रपती शिवाजी महाराज की जयफचा जयघोष करत, हातात भगवा आणि तिरंगा ध्वज, पाठीशी कपडे, साहित्याची बॅग बांधून दोघे दररोज 30 ते 35 किलोमीटर अंतर चालत आहेत. कडाक्याची थंडी, वातावरणातील बदल याची तमा न बाळगता नियमितपणे दोघांचा प्रवास सुरू आहे.
जागा मिळेल तेथे आश्रय
रात्रीच्या मुक्कामासाठी कधी मंदिराचा आश्रय मिळतो. काही ठिकाणी मुक्कामाला जागा न मिळाल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानकात दोघांना मुक्काम करावा लागत आहे. काही ठिकाणी सेवाभावी कार्यकर्ते जेवण, मुक्कामी सोय करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी मुक्काम, जेवण, नाष्टा अशा अडचणीला सामोरे जात न थकता तुषार व निरज यांचा प्रवास सुरू आहे.दिवसाला 25 ते 30 किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला जात आहे. ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे, तेथे शिवरायांना मानवंदना दिली जाते. काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते मदत करत आहेत. काही ठिकाणी मदत मिळत नाही. खडतर प्रवास असून अडचणी येत आहेत; मात्र शिवरायांच्या विचाराने आत्मिक बळ मिळत आहे.निरज गवारे, शिवभक्त