पुणे : यंदा कर्तव्य असणार्‍यांना जूनपर्यंत मुहूर्त, सहा महिन्यांत लग्नाचे 54 तारखा | पुढारी

पुणे : यंदा कर्तव्य असणार्‍यांना जूनपर्यंत मुहूर्त, सहा महिन्यांत लग्नाचे 54 तारखा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘गंगा… यमुना… सरस्वती…’ अशी मंगलाष्टके अन् ‘वाजवा रे वाजवा’ची आरोळी… अशी धामधूम या महिन्यात सुरू झाली ती थेट जून महिन्यापर्यंत चालणार आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच लग्नाचे जास्त मुहूर्त असल्याने वर-वधुपित्यांची तयारीसाठी धावपळ आतापासूनच सुरू झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे मोजक्या वर्‍हाडींच्या उपस्थितीत लग्नसोहळे आटोपले जात होते. यंदा मात्र कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे वर्‍हाडींची मर्यादा संपुष्टात येऊन लग्नसोहळे उत्साहात पार पाडले जात आहेत.

सगळीकडे लग्नाचा धूमधडाका सुरू असून, एप्रिल वगळता डिसेंबर ते जून हे सलग सहा महिने लग्नासाठी एकूण 54 मुहूर्त आहेत. यात सर्वांत जास्त मे महिन्यामध्ये 14 लग्नाचे मुहूर्त असून, फेब्रुवारीमध्ये 11 तर जून महिन्यामध्ये 12 मुहूर्त आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लग्नासाठी विविध मुहूर्त असून, 2023 मध्ये एप्रिल वगळता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे आणि जून या महिन्यांमध्ये अनेक मुहूर्त आहेत. अनेक जोडप्यांनी शुभ मुहूर्तावर लग्न करण्यासाठीचे नियोजन केले आहे. काही जण जानेवारीत तर कोणी मेमध्ये लग्न करणार आहेत. यंदाच्या वर्षात लग्नासाठी अनेक मुहूर्त असल्याचे दाते पंचागकर्तेचे मोहन दाते यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘जून 2023 पर्यंत लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. मे महिन्यामध्ये सर्वाधिक 14 मुहूर्त असून, 2023 या वर्षात लग्नासाठी अनेक मुहूर्त आहेत. नवीन वर्षी अनेकांना लग्नाची आयुष्यभराची रेशीमगाठ बांधता येणार आहे. दरवर्षी जुलैनंतर काही महिने लग्नाचे मुहूर्त नसतात, दिवाळीनंतरच लग्नाचे मुहूर्त असतात. पुढीलही वर्षी जुलैनंतर थेट नोव्हेंबरनंतर लग्नाचे मुहूर्त असतील. 2022 पेक्षा 2023 मध्ये लग्नाचे मुहूर्त अधिक आहेत.

लग्नाळुंनो, हे लक्षात ठेवाच!
वर्ष             मुहूर्तांची संख्या
डिसेंबर                8
2022
जानेवारी             4
फेब्रुवारी           11
मार्च                   5
मे                    14
जून                  12

Back to top button