महापालिका अधिकाऱ्यांच्या भांडणात तिसऱ्याच अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती
पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका मधील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खेचाखेची सुरू असतानाच राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर वर्णी लागण्यासाठी महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती.
यामध्ये प्रतिस्पर्धी अधिकाऱ्याचा स्पर्धेतून पत्ता कट करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर केला. या पदावर नेमकी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता असताना, राज्य शासनाने महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ झाल्याचे बोलले जात आहे