धक्कादायक..! पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात बालविवाह, अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे प्रकार उघड | पुढारी

धक्कादायक..! पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात बालविवाह, अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे प्रकार उघड

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : कोरोनाकाळात पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात बालविवाह झाल्याचे आता समोर येऊ लागले आहे. लपूनछपून केलेल्या बालविवाहामध्ये अल्पवयीन मुली गरोदर राहून प्रसूतीसाठी खासगी, सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यावर या बाबी समोर येऊ लागल्या आहेत. खेड तालुक्यात यासंदर्भात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यात गेल्या दीड वर्षात या प्रकारे चार गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

बालविवाहाची बहुतेक सर्व प्रकरणे ठाकर, आदिवासी समाजाच्या कुटुंबातील आहेत. राज्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कायदा अस्तित्वात आहे. या अंतर्गत अशा प्रकारे बालविवाह लावून देणारे कुटुंब, भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय मालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. परंतु कोरोना काळात संपूर्ण राज्यातच घरच्या घरी लपून छपून मोठ्या प्रमाणात बालविवाह लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

परंतु यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या प्रगत व सामाजिक वारसा असलेल्या जिल्ह्यातदेखील हीच परिस्थिती असल्याचे आता उघड होत आहे. कोरोना काळात लपून छपून झालेल्या बालविवाहानंतर आता या मुली गरोदर राहून प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बहुतेक प्रकार उघड होत आहे. खेड उपविभागीय हद्दीत गेल्या दीड-दोन वर्षांत बालविवाहासंदर्भात बलात्काराचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दोन गुन्हे मंचर पोलिस ठाणे, एक घोडेगाव आणि एक खेड तालुक्यात दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाकाळात लोकांकडून प्रामुख्याने ठाकर समाज, आदिवासी समाजातील अल्पवयीन मुला-मुलींची लग्ने लावून देण्यात आली. परंतु, आता अशा अल्पवयीन मुली प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर संबंधित दोन्ही कुटुंबांवर आयपीसी 376 अंतर्गत थेट बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो. यामुळे संबंध मुला-मुलींचे आयुष्य तर उद्ध्वस्त तर होतेच, दोन्ही कुटुंबांवर देखील परिणाम होतो. यामुळेच बालविवाह करू नये, यासाठी कुटुंबप्रमुखाने तर पुढाकार घ्यावा, विविध सामाजिक संस्था, नेते यांनी पुढाकार घेऊन यासंदर्भात जनजागृती करावयास हवी.

                                                                    – सुदर्शन पाटील,                                                                                     उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड

आजही काही ठरावीक समाजात बालविवाह केले जातात. आदिवासी समाजामध्ये याबाबत चांगली जनजागृती झाली आहे. परंतु ठाकर समाज, कातकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह केले जात आहेत. या लोकांमध्ये दररोजच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो. यामुळे बालविवाह किंवा अन्य प्रश्नांबाबत दुर्लक्ष होते. यामुळेच जनजागृती व त्यासंदर्भात निर्माण होणारे प्रश्न, समस्या दूर केल्या तरच बालविवाह कमी होण्यास मदत होईल.
                                                                     – सीताराम जोशी,
                                                        अध्यक्ष, आदिवासी समाज कृती समिती

Back to top button