पुणे : सीओईपीचा रेल्वे-मेट्रो अभ्यासक्रम बंद, तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात | पुढारी

पुणे : सीओईपीचा रेल्वे-मेट्रो अभ्यासक्रम बंद, तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात

गणेश खळदकर

पुणे : नुकताच तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा मिळालेल्या सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेने गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेल अँड मेट्रो टेक्नॉलॉजी अर्थात पीजीडीआरएमटी हा अभ्यासक्रम अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, तब्बल अडीच लाख शुल्क भरलेले विद्यार्थी यामुळे सैरभैर झाले असून, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या देशात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने सरकारी रेल्वेबरोबरच खासगी भागीदारीच्या माध्यमातून मेट्रोरेल्वेचे जाळे तयार करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेक्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.

याचाच विचार करून सीओईपीमध्ये एक वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सीओईपीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पीजीडीआरएमटी हा आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आहे. यामध्ये सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, सिग्नल अँड टेलिकॉम इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे. 25 विद्यार्थ्यांची एक बॅच अशा पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. मात्र यंदा केवळ तीन विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑगस्ट महिन्यात संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश
प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता सीओईपी प्रशासन केवळ विद्यार्थिसंख्या पुरेशी नसल्याचे कारण देत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यास सांगत आहे. तर, विद्यार्थी मात्र अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी करीत आहेत. अभ्यासक्रम सुरू न झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे.

मला माझ्या भावाकडून संबंधित अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात या अभ्यासक्रमाचे एकरकमी अडीच लाख रुपये शुल्क भरले आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी अभ्यासक्रमाला सुरुवात झाली नाही. यासंदर्भात सीओईपी प्रशासनाशी वारंवार संपर्क केला. आता प्रशासन म्हणत आहे की, अभ्यासक्रमाला कमी विद्यार्थी असल्यामुळे या वर्षी अभ्यासक्रम सुरू करणार नाही. तुम्ही तुमचा प्रवेश रद्द करा. मला मात्र हा अभ्यासक्रम शिकायचाच आहे. त्यामुळे सीओईपीने तत्काळ हा अभ्यासक्रम सुरू करावा.
                – संमेद पाटील, विद्यार्थी, सीओईपी (पीजीडीआरएमटी अभ्यासक्रम)

संबंधित महाविद्यालय नामांकित असून, नुकताच विद्यापीठाचा दर्जा देखील मिळाला आहे. म्हणून अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. आता प्रशासन विद्यार्थी कमी असल्याचे कारण देत अभ्यासक्रम सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे. परंतु, आता डिसेंबर महिना उजाडला असून, इतर सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश संपले आहेत. त्यामुळे आमचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. शासकीय संस्था असल्यामुळे विद्यार्थिसंख्येचे कारण संबंधित संस्थेने देणे योग्य नाही. हे कारण खासगी संस्थेने दिले असते तर चालले असते. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू करावा, हीच आमची मागणी आहे.

                    – रवी माहुले, विद्यार्थी, सीओईपी (पीजीडीआरएमटी अभ्यासक्रम) 

हा अभ्यासक्रम स्वयंअर्थसाहाय्यित आहे. त्यासाठी मेट्रोचे तज्ज्ञ लोक बोलवावे लागतात. त्यामुळे किमान 20 विद्यार्थी असतील, तरच हा अभ्यासक्रम घेणे परवडणारे आहे. यंदा अपेक्षित विद्यार्थी आले नाहीत. त्यामुळे या वर्षापुरता हा अभ्यासक्रम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम बंद करण्यात आमचा कोणताही हेतू नाही. मात्र, विद्यार्थीच उपलब्ध न झाल्यामुळे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात संबंधित अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी उपलब्ध झाल्यास पुन्हा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
                       – डॉ. एम. एस. सुतावणे, कुलगुरू, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ

अभ्यासक्रमाचा काय आहे फायदा..?
– रेल्वेक्षेत्रात नोकरीच्या संधी
– रेल्वेसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते.
– रेल्वे आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते.
– रेल्वेच्या विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करता येते.

Back to top button