कंपनीच्या आश्वासनामुळे आंदोलन रद्द नाहीतर, कामगारांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू : आ. शेळके | पुढारी

कंपनीच्या आश्वासनामुळे आंदोलन रद्द नाहीतर, कामगारांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू : आ. शेळके

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या सव्वा महिन्यापासून ठिय्या आंदोलन करून न्याय मिळण्यासाठी लढा देणार्‍या एलअँडटी कंपनीतील कामगारांच्या हक्कासाठी अखेर 2 डिसेंबरला तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला होता, त्यानुसार आंदोलनाची तयारी ही झाली होती. दरम्यान आज कंपनी व्यवस्थापन व कामगार आयुक्त कार्यालयाने सोमवारपर्यंत कामगारांना कामावर घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

एलअँडटी कंपनीमध्ये काम करणारे स्थानिक भूमिपुत्र आपल्या हक्कासाठी पुणे कामगार आयुक्तालय या ठिकाणी आंदोलन करत आहेत. कामगार आयुक्तालय व कंपनी व्यवस्थापन यांच्या मध्यस्थीने बैठकीतून मार्ग निघेल, अशी अपेक्षा असताना स्थानिक भूमिपुत्रांना वार्‍यावर सोडून कंपनी चालवून दाखवू अशी आडमुठेपणाची भूमिका कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याने आमदार शेळके यांनी 2 डिसेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार, आज खडबडून जागे झालेल्या कंपनी व्यवस्थापन व कामगार आयुक्त कार्यालयाने संबंधित कामगारांना कामावर कशा पद्धतीने व किती कामगारांना घेता येईल यादृष्टीने सकारात्मक भूमिका घेऊन सोमवारपर्यंत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे तूर्त हे आंदोलन थांबविण्यात आले असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार शेळके यांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार्‍या आंदोलनकर्त्यांना यासंदर्भात माहिती दिली.

आमचा संयम सुटू देऊ नका !

सोमवारपर्यंत न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा, आमचा संयम सुटू देऊ नका. न्याय मिळाला नाही, आणि कामगारांवर कुठला गुन्हा दाखल होत असेल तर मी स्वतः भोगायला तयार आहे,
त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, अशीही स्पष्ट भूमिका आमदार शेळके यांनी या वेळी मांडली.

Back to top button