राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा: अजित पवार यांचा पलटवार

राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा: अजित पवार यांचा पलटवार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जाती-पातीचे विष पेरले गेले अशी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २ डिसेंबरला बारामतीत प्रत्युत्तर दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी ठाकरे यांनी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचे अजित पवार म्हणाले.

बारामतीत पवार हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यात काहीही तथ्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव घेतले की बातमी होते. पवार यांची मुलाखत घेताना राज ठाकरे काय बोलले होते, हे सर्वांना माहिती आहे. तरीही ते दुटप्पी वागत आहेत. पवार यांना अवघा महाराष्ट्र गेली ५५ वर्षे ओळखतो आहे. त्यांनी नेहमी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार डोळ्यापुढे ठेवून सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेवून जाण्याचे काम केले आहे. ठाकरे यांचा हा आरोप हास्यास्पद असून त्यात नखभर देखील तथ्य नाही.

कर्नाटक सरकारने जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून दिल्याच्या व एकूण तेथील परिस्थितीविषयी पवार म्हणाले, आपण अनेकदा तिकडे दुधगंगेचे पाणी सोडले आहे. आपण नेहमी एकमेकाला तशा प्रकारची मदत करत असतो. कधी उजनीतून पाणी देतो, कधी कर्नाटकवाले तिकडून येणाऱ्या नदीतून पाणी देतात. त्याला वेगळे स्वरुप देण्याची गरज नाही. शेवटी पाणी देणं हे पुण्याचं काम आहे.

भाजपकडून समान नागरी कायद्यासंबंधी हालचाली सुरु असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आत्ता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी काही राज्यांमध्ये तशा प्रकारचे सुतोवाच केले आहे. स्वतः राजनाथ सिंह हे ही यासंबंधी बोलले. सुतोवाच करणे वेगळे व अंमलबजावणी करणे वेगळे. सध्या ते जे बोलत आहेत त्यातून त्यांना समाजातून काय रिअॅक्शन येते, काय पडसाद उमटतात, हे पाहायचं असेल. त्यातून अशी स्टेटमेंट केली जात असतात.

राज्याचे मुख्यमंत्रीपद महिलेला मिळावे अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, कोणाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ चा आकडा गाठावा लागतो. तो आकडा कोणाकडे असेल तर महिला-पुरुष कोणीही मुख्यमंत्री होवू शकतो.

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिलीतील आयसीयू सेंटर धूळखात पडून असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, बारामतीचा सर्वांगिण विकास अद्याप झालेला नाही, प्रक्रिया सुरु आहे. प्रयत्न केले जात आहेत. पूर्वी मी सरकारमध्ये असल्याने या गोष्टी झटपट होत होत्या. आत्ताच मी वेगळ्या कामासंबंधी वैद्यकीय मंत्री गिरीष महाजन यांच्याशी बोललो. आपण जे सांगत आहात त्याची माहिती घेत दुरुस्ती केली जाईल.

विस्तारात कोणाला संधी हा त्यांचा प्रश्न
मंत्रीमंडळामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचा समावेश करता येतो. सध्या २० जण कार्यरत आहेत. आणखी २३ जणांना मंत्रीपदे मिळू शकतात. संधी मिळावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतील. विस्तारात कोणाला संधी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे.

सीमा वाद प्रश्नी महाराष्ट्राने साळवींची नेमणूक करावी
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे स्वतः गेले. त्यांनी रोहतगी या ख्यातनाम वकिलांची नेमणूक केली आहे. स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने हरिष साळवींकडे जबाबदारी दिली होती. सध्याच्या सरकारने नागपूरचे सुपुत्र असलेल्या साळवी यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी. सर्वोच्च न्यायालयातील प्रमुख पाच वकिलांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

छत्रपतींबद्दलची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल चुकीची वक्तव्ये जाणिवपूर्वक केली जात आहेत. त्याकडे राज्यकर्ते लक्ष देताना दिसत नाहीत. तेवढ्यापुरते उत्तर देवून वेळ मारून नेली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राच्या भावना अतिशय तीव्र आहेत. कोणीही उठसूट वक्तव्य करणे राज्यातील जनता कदापी सहन करणार नाही. ज्या कोणी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे, त्यांच्या वरिष्ठांनी यात लक्ष घालून संबंधितांवर अॅक्शन घ्यावी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news