भारतीय उलुक उत्सवात 130 हून अधिक शाळा | पुढारी

भारतीय उलुक उत्सवात 130 हून अधिक शाळा

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील इला फाडेशन या संस्थेच्या वतीने ‘इला हॅबिटॅट‘ पिंगोरी (ता. पुरंदर) येथे भारतातील तिसरा उलुक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उलूक उत्सवाचे उद्घाटन तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दोन दिवस चालणार्‍या या उत्सवास अंदाजे 25 हजार विद्यार्थी भेट देणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 130 हून शाळा यामध्ये सहभागी झाल्या. या महोत्सवाच्या माध्यमातून उलुक म्हणजेच घुबडाबद्दलची माहिती दिली जाते, तसेच घुबडाबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

पिंगोरी येथील ”इला फाउंडेशनच्या” माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी घुबडाची काढलेली चित्रे बनवलेल्या प्रतिकृती यांचे प्रदर्शन भरविले, तर घुबडाची रांगोळी आणि घोड्यांचे टॅटू काढण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना काही फिल्म दाखवून घुबडाबद्दलची माहिती दिली जाते. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांकडून अनेक नाटकांच्या माध्यमातून घुबडांबद्दल माहिती दिली जात आहे.

या वेळी पिंगोरी गावचे सरपंच संदीप यादव, माजी सरपंच जीवन शिंदे, उपसरपंच प्रकाश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिंदे, राहुल शिंदे, चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय रावळ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, रामदास शिंदे, वसंत ताकवले, इला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश पांडे, डॉ. सुरूची पांडे आदींसह परिसरात ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

घुबड हा तसा शेतकर्‍यांसाठी मित्रच आहे. पण, त्याच्याबद्दल असलेल्या गैरसमजामुळे किंवा अंधश्रद्धा असल्यामुळे त्याचाकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, त्याबद्दलची खरी माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवली जाते आहे. आता घुबडाकडेही लोक मित्रत्वाच्या नजरेने पाहू लागले आहेत; या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो घरात घुबडाबाबतची माहिती आम्ही पोचवू शकलो.
                                          – डॉ. सतीश पांडे, संस्थापक अध्यक्ष, इला फाउंडेशन

Back to top button