बेल्हे : एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बस रस्त्यावर | पुढारी

बेल्हे : एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बस रस्त्यावर

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या एसटीकडे महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी या घोषणेसोबत प्रवास करणारी एसटी राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचली.

काही गावात रस्ता चांगला नसतानाही केवळ प्रवाशांची गैरसोय नको म्हणून सेवा दिली जात आहे. मात्र त्या बसगाड्यांची अत्यंत दुर्दशा आहे. बसच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. काही गाड्यांना इंडिकेटर नाहीत. नवीन टायर उपलब्ध होत नसल्याने पंक्चरचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असतानाही महामंडळाने मात्र दुर्लक्षच केले आहे.

तालुक्यातील रस्ते खराब असल्याने त्यावर एसटीच्या आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत. गाड्यांचे इंडिकेटर खराब, बर्‍याच गाड्या तर चावीविनाच सुरू होतात. रस्ता खराब असल्याने बसगाड्यांची अधिकच दुर्दशा झाली आहे. खराब गाड्यांतून प्रवास करणे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. महामंडळाचे आकर्षण असलेली मिनी बसही आता अखेरच्या घटका मोजत आहे. छोट्या बस सातत्याने नादुरुस्त होत रस्त्यात मध्येच बंद पडतात, अशा तक्रारी आहेत.

गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात चालढकल
नव्या बसगाड्या नसल्यामुळे नाईलाजाने एसटी महामंडळाला जुन्या बसगाड्यांद्वारे सेवा द्यावी लागत आहे. जुन्या, आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढल्या जातात. महामंडळाकडून दरवर्षी स्क्रॅप धोरण निश्चित करून विभागांना कळवले जाते. या वर्षात मात्र असे धोरणच कळवलेले नाही. त्यामुळे कोणत्या गाड्या भंगारात काढायच्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, असे नारायणगाव एसटी आगारातील वर्कशॉप कर्मचार्‍यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.

 

 

Back to top button