पिंपरी : राष्ट्रवादीकडून खोडा घालून पाणी रोखण्याचे कारस्थान | पुढारी

पिंपरी : राष्ट्रवादीकडून खोडा घालून पाणी रोखण्याचे कारस्थान

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे पवना बंदीस्त जलवाहिनी प्रकल्पातून एक थेंबही पाणी मिळाले नाही. आता, भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी मिळवण्यासाठी सुरू होणार्‍या जॅकवेलच्या कामाला खोडा घालण्याचे पाप राष्ट्रवादी करीत आहे. या कामात भ—ष्टाचार झाल्याचे किंवा भाजप नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईल, असे आव्हान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी गुरूवारी (दि.1) दिले आहे.

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भामा आसखेड धरणातून पाणी मिळवण्यासाठी जॅकवेलफ उभारण्याच्या निविदेत भ—ष्टाचार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालिका अधिकार्‍यांना घेराव घातला. त्या प्रकरणात भाजप नेत्यांचा हस्तपेक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याला एकनाथ पवार यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

शहराचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न

पवार म्हणाले, की जॅकवेलच्या कामाची निविदा 2021 मध्ये प्रसिद्ध झाली. त्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोनदा मुदतवाढ देण्यात आली. दोन कंपन्यांनी निविदा भरली. त्यातील एक अपात्र झाली. निविदा स्वीकृती रकमेपेक्षा जास्त दराने निविदा भरणार्‍या ठेकेदार कंपनीला प्रशासनाने 2 वेळा पत्र पाठवून दर कमी करण्याची सूचना केली. त्यानुसार कंपनीने 17 कोटी रुपये कमी केले. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी करीत प्रकल्पाला खोडा घालून शहराचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अपेक्षाभंग झाल्यामुळे अधिकार्‍यांना घेराव

अपात्र ठरलेल्या कंपनीला महाविकास आघाडीच्या काळात मुंबई व पुणे येथील शेकडो कोटी रुपयांची कामे दिल्याचे निदर्शनास आले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अपात्र कंपनीला काम मिळावे, अशी अपेक्षा होती. अपेक्षाभंग झाल्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना निविदा राबवल्यानंतर तीन महिन्यांनी जाग आली. अधिकार्‍यांना घेराओ घालणार्‍यांमध्ये राष्ट्रवादीतील व्यावसायिक नेत्यांचा भरणा मोठा होता, अशी टीका त्यांनी केली आहे.

Back to top button