‘विक्रम गोखले अभिनयाचे विद्यापीठ’; सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींची श्रद्धांजली | पुढारी

‘विक्रम गोखले अभिनयाचे विद्यापीठ’; सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींची श्रद्धांजली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ’कलानिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा जोपासणारे कलाकार म्हणजे विक्रम गोखले. ते अभिनयाचे विद्यापीठ होते. ते एक अभ्यासू कलाकार आणि निर्भिड वक्तेही होते. त्यांना सैनिकांविषयी आदर होता. त्यांनी कला क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. ती कोणीच भरून काढू शकणार नाही,’ अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी गुरुवारी (दि.1) दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली.

संस्कार भारती पश्चिम प्रांत आणि विवेक व्यासपीठाच्या वतीने विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजिलेल्या सभेत कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, अभिनेते राहुल सोलापूरकर, रंगकर्मी योगेश सोमण, संस्कार भारतीचे सतीश कुलकर्णी, विवेक व्यासपीठचे महेश पोहनेरकर आदींनी भावनांना वाट करून दिली. शाहीर हेमंत मावळे उपस्थित होते.

भूषण गोखले म्हणाले, ’सैनिकांबद्दल गोखले यांना असलेला त्यांचा आदर वाखाणण्याजोगा होता. तळागाळातील लोकांना मदत करण्याची त्यांची भावना मी बर्‍याच वेळा अनुभवली. त्यांनी कला क्षेत्रात मोठे योगदान दिले.’ सोलापूरकर म्हणाले, ’अनेक वर्षांची गोखले यांच्याशी ओळख होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी नकळत त्यांची बांधिलकी होती. अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो.

शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती होती. सातत्याने विचार प्रकट करणे आणि आग्रही भूमिका घेत राहणे आणि स्वतः मधला दर्दी कलाकार जिवंत ठेवणारे कलाकार म्हणजे गोखले.’सोमण म्हणाले, ’गोखले हे अभिनयाचे विद्यापीठ होते. बॅरिस्टर नाटकाच्या बाबतीत ते कार्यशाळा घेणार होते. ते कामही पूर्ण करणार आहोत. आताच्या घडीला त्यांचे त्यावरील काही व्हिडिओ आणि लेख उपलब्ध आहेत. ही शिदोरी घेऊन मार्गक्रमण करणार आहोत.’

नाट्य परिषदेकडून सोमवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखा व आम्ही कोथरुडकर यांच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन केले आहे. सोमवारी (दि.5) सायंकाळी पाच वाजता कर्वे रस्त्यावरील अंतरनाद योग केंद्रात (करिश्मा सोसायटीजवळ) सभा होईल. सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री आशा काळे, विजय फळणीकर, राजेश दामले, राज काझी, श्रीराम रानडे , वृषाली गोखले आदी गोखले यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

Back to top button