पुणे: स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाला आजपासून सुरूवात | पुढारी

पुणे: स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाला आजपासून सुरूवात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यामध्ये गुरूवार (दि.1) पासून ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाला सुरूवात करण्यात आली. हे अभियान 31 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ, शुध्द व शाश्वत पिण्याच्या पाण्याचा नागरिकांना नियमित पुरवठा व्हावा या हेतून या अभियानाची सुरूवात करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

या अभियानादरम्यान विविध बाबी हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये हर घर जल या मोबाईल अ‍ॅपव्दारे नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जीओ टॅगिंग करणे, पाणी गुणवत्ता परीक्षण करण्यात येणार आहे. गावात पाणी गुणवत्ता विषयक कामांसाठी निवड केलेल्या 5 महिलांव्दारे पाणी तपासणी, मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी गुणवत्ता परिक्षण करणे, मान्सून पश्चात विहित कालावधीत सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्याकरीता पाणी नमुने गोळा करण्याचे कामे या अभियानात केली जाणार आहेत.

या मोहीम कालावधीत पाणी नमुना प्रयोगशाळा तपासणीत रासायनिक किंवा जैविक घटकांसाठी दूषित आढळलेल्या पाणी स्त्रोतांवर उपचारात्मक उपाययोजना करुन त्याची नोंद केंद्राच्या संकेत स्थळावर करण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

Back to top button