बारामती : ट्रकला बनावट क्रमांक टाकत शासनाचा कर चुकवला | पुढारी

बारामती : ट्रकला बनावट क्रमांक टाकत शासनाचा कर चुकवला

बारामती; पुढारी वृत्तसेवा : मूळ क्रमांक बदलून बनावट क्रमांक टाकत शासनाचा सुमारे 54 हजार रुपयांचा कर चुकवल्याचे प्रकरण बारामतीत उघड झाले. आरटीओ कार्यालयाने या प्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार तिघांविरोधात कर चुकवेगिरी करत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालक चांगदेव पंढरीनाथ जगदाळे, रमेश शंकर बागनवर (रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व श्रीहरी काळे (रा. नारायणवाडी, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सहायक मोटार वाहन निरीक्षक अमरसिंह मारुती चोथे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुरुवारी (दि. 24 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी चोथे हे एमआयडीसी भागात थांबले असताना जळोची बाजूकडून सहा चाकी ट्रक उसाने भरून येत असलेला दिसून आला. ट्रकवर पुढे आणि मागे एमएच 15 जी 8853 हा क्रमांक होता. याबाबत शंका आल्याने ई चलन मशिनवर हा क्रमांक तपासला असता त्यावर अल्ताफ नूरमोहंमद तांबोळी (रा. फकिरवाराडा दर्गा, अहमदनगर) असे नाव दिसून आले.

संशय आल्याने ट्रक थांबवून चॅसी क्रमांक तपासला असता तो रिपंच केलेला दिसून आला. चॅसी क्रमांकावरून खात्री केली असता हा ट्रक श्रीहरी काळे यांच्या नावे असल्याचे दिसून आले. ट्रकचालक जगदाळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा ट्रक बागनवर यांचा असल्याचे सांगितले. त्यानुसार बागनवर यांना बोलावून घेत चौकशी केली असता त्यांनी काळे यांच्याकडून ट्रक विकत घेतल्याचे सांगितले. अधिक चौकशीत या वाहनाचा मूळ क्रमांक वेगळाच असल्याचे दिसून आले.

 

 

 

 

Back to top button